आमदारकीसाठीची येट्स दाम्पत्याची धडपड फळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:40 AM2018-05-11T05:40:57+5:302018-05-11T05:40:57+5:30
मंत्रालयात आणि अधिवेशनादरम्यान विधानभवनात येट्स दाम्पत्य वावरताना दिसते. आपल्याला आमदारकीची पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून डेस्मंड कायम धडपडत अन् त्यांच्या पत्नी नीलिमा सावलीसारख्या त्यांच्यासोबत असत.
मुंबई - मंत्रालयात आणि अधिवेशनादरम्यान विधानभवनात येट्स दाम्पत्य वावरताना दिसते. आपल्याला आमदारकीची पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून डेस्मंड कायम धडपडत अन् त्यांच्या पत्नी नीलिमा सावलीसारख्या त्यांच्यासोबत असत. या दाम्पत्याची धडपड आता फळाला आली असून तब्बल १६ वर्षांनंतर डेस्मंड हे पुन्हा एकदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आहेत.
नवे सरकार आल्यानंतर लगेच काही दिवसांत अँग्लो इंडियन आमदार नामनियुक्त होण्याची अपेक्षा असते. पूर्वी तसा प्रघातदेखील होता. मात्र, विद्यमान सरकारने डेस्मंड यांच्या रुपाने तब्बल साडेतीन वर्षांनंतर अँग्लो इंडियन सदस्याची जागा भरली आहे. त्यामुळे डेस्मंड यांना दीड वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी त्यांना अँग्लो इंडियन सदस्य म्हणून विधानसभेवर नामनियुक्त केले आहे.
आपल्याला आमदारकीची पुन्हा संधी मिळावी म्हणून डेस्मंड यांनी चिकाटीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांना यश मिळाले. डेस्मंड आणि नीलिमा यांची जोडी इतकी पक्की आहे की मागील युती सरकारच्या काळात डेस्मंड जेवढा वेळ विधानसभागृहात बसत तितका वेळ त्या देखील प्रेक्षक दीर्घेत बसून असत.
आतापर्यंतचे अँग्लो इंडियन आमदार
पी.व्ही.गिलेस्पी, आयरिन लिलियन गिलेस्पी, नॉर्मन रेगिनाल्ड फर्ग्युसन, एम.सी.फर्नांडिस, डेनिस लॉरेन्स इमो, ई.जी.वूडमन, सी.एल. प्राऊडफूट, डेस्मंड येट्स, व्हिक्टर फ्रेट्स हे आतापर्यंतचे महाराष्ट्रातील अँग्लो इंडियन आमदार राहिले आहेत.