एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर यांना संधी, ऐनवेळी सदाभाऊ खोत यांनीही दाखल केला उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 07:30 AM2022-06-10T07:30:48+5:302022-06-10T07:31:38+5:30
Maharashtra legislative council election : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे यांनी अर्ज भरला.
मुंबई : विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी विधिमंडळात आपले उमेदवारी अर्ज सादर केले. तर ऐनवेळी भाजपच्या पाठिंब्याने सदाभाऊ खोत यांनीही अर्ज दाखल केले.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे यांनी अर्ज भरला. तर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांचा एक अतिरिक्त अर्जही सादर करण्यात आला. याशिवाय, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या नेत्यांनीही उमेदवारी अर्ज सादर केले. भाजपच्या जाहीर उमेदवारांपैकी उमा खापरे यांनी गुरुवारी आपला अर्ज सादर केला. तर भाजपसोबत असलेल्या रयत क्रांतीच्या सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी भाजपच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार म्हणून आपली दावेदारी सादर केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्यासोबत होते.
विधान परिषदेसाठी भाजपने पाच नावांची घोषणा केली आहे. तर, सदाभाऊ खोत यांना पाठिंबा देत मैदानात उतरवले आहे. त्यामुळे भाजपकडून एकूण सहा अर्ज सादर झाले आहेत. तर, शिवसेना आणि काँग्रेसकडून प्रत्येकी दोन- दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर, राष्ट्रवादीकडून अतिरिक्त उमेदवार शिवाजीराव गर्जे यांच्या अर्जासह एकूण तीन अर्ज आले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवार रिंगणात आहेत.
उमेदवारीचा निर्णय एकमताने - जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या नावांची घोषणा केली. शेवटच्या दिवशी नावे जाहीर झाल्याने या दोन्ही नावांमुळे पक्षात नाराजी असल्याचे वृत्त होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच ही उमेदवारी देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. या उमेदवारीबाबत पक्षात नाराजी असल्याचं वृत्त चुकीचे असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.