आनंदाची बातमी! राज्याला मिळणार आणखी ३ वंदे भारत एक्स्प्रेस? २ मुंबईहून, १ पुण्यातून सुटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:50 AM2023-10-17T11:50:19+5:302023-10-17T11:51:37+5:30
Vande Bharat Express Train: दिवाळीत काही वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
Vande Bharat Express Train: आताच्या घडीला देशभरात ३४ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची सेवा सुरू झाली असून, आणखी ९ मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. दिवाळीच्या दरम्यान ९ नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण केले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. यामध्ये महाराष्ट्राला आणखी तीन वंदे भारत एक्स्प्रेस मिळण्याची शक्यता असून, यातील २ वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून, तसेच एक वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यातून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय रेल्वेची वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन आताच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय सेवा असून, प्रवाशांची पसंती या ट्रेनना मिळत आहे. सन २०१९ मध्ये पहिली वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसी मार्गावर चालवण्यात आली होती. शताब्दी ट्रेनच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. यानंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. याशिवाय सर्वसामान्यांसाठी वंदे मेट्रो आणि साधारण वंदे भारत ट्रेन चालवण्याची रेल्वेची योजना आहे. देशभरात या ट्रेन चालवल्या जाणार असून, अन्य राज्यांकडूनही अधिक वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालवण्याची मागणी होत आहे.
राज्याला मिळणार आणखी ३ वंदे भारत एक्स्प्रेस?
मुंबई-गोवा, मुंबई-साईनगर शिर्डी, मुंबई-सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यावरुन जाते. परंतु आतापर्यंत पुण्याहून सुटणारी एकही वंदे भारत एक्स्प्रेस नाही. आता पुणे ते सिकंदराबाद अशी थेट धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. देशभरात दिवाळीत नऊ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. त्यात पुणे ते सिंकदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे, असे म्हटले जात आहे. याशिवाय, मुंबई ते कोल्हापूर आणि मुंबई ते जालना या मार्गांवरही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दिवाळीत देशात ९ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. त्यातील ३ वंदे भारत एक्स्प्रेस मध्य रेल्वे विभागात चालवण्यात येणार आहे. दुसरीकडे, इंदोर-भोपाळ या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा अगदीच अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. या पार्श्वभूमीवर आता ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा सेवा विस्तार नागपूरपर्यंत करण्यात आला आहे.