मोठी घोषणा! पूरग्रस्तांना नुकसान भरपाईची मर्यादा २ हेक्टरवरुन ३ हेक्टर; NDRF च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 06:01 PM2022-08-10T18:01:51+5:302022-08-10T18:03:07+5:30
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबतचा महत्वाचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.
मुंबई-
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबतचा महत्वाचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. यात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना दिली. "अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे झाले आहेत. जवळपास १५ लाख हेक्टरपर्यंत नुकसान होऊ शकतं. यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं आज एक विशेष बाब म्हणून आतापर्यंतची सर्वाधिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषांच्यापेक्षाही दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये झाला आहे", असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी जी दोन हेक्टरची मर्यादा होती ती आता तीन हेक्टर करण्यात आल्याचं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. एनडीआरएफच्या निकषांनुसार दर हेक्टरमागे ६,८०० रुपये अशी नुकसान भरपाई देण्यात येते. पण एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देऊ, असं शिंदे म्हणाले.
मुंबई मेट्रो-३ च्या वाढीव बजेटला मान्यता
"मुंबई मेट्रो-३ च्या प्रकल्पाची २०१५ साली २३ हजार कोटी रुपये किंमत होती. पण मध्यंतरीच्या काळात अडीच वर्षाच्या काळात काम बंद असल्यासारखंच होतं. कारशेडवरच्या स्थगितीमुळेही काम रखडलं. आता या प्रकल्पाला १० हजार कोटींच्या वाढीव निधीला मान्यता दिली आहे. त्यामुळे २३ हजार कोटींचा प्रकल्प आता ३३ हजार कोटींवर गेला आहे", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात
>> कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता (नगरविकास विभाग)
>> अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत, एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार. (मदत व पुनर्वसन विभाग)
>> रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता (वैद्यकीय शिक्षण विभाग)