Maharashtra Local Body Election: मुंबई-ठाण्यासह २० महानगरपालिकांची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात? असा असेल कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 08:43 AM2022-01-31T08:43:59+5:302022-01-31T08:44:56+5:30
Maharashtra Local Body Election: मार्च आणि एप्रिलमधील शाळा- कॉलेजच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिलअखेरीस किंवा मे महिन्यात मुंबईसह २० महापालिकांच्या निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.
मुंबई : वाढीव वॉर्डांसह मुंबईतील प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा निश्चित करणे आणि बहुसदस्यीय प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जारी केला आहे. त्यानुसार २ मार्चला अंतिम आराखडा प्रसिद्ध केला होईल. त्यामुळे मार्च आणि एप्रिलमधील शाळा- कॉलेजच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिलअखेरीस किंवा मे महिन्यात मुंबईसह २० महापालिकांच्या निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांचा कालावधी ८ मार्चला संपुष्टात येईल. त्यामुळे त्याआधी अर्थात फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होतील, अशी शक्यता होती. मात्र, प्रारूप आराखडा अंतिम करणे, बहुसदस्यीय प्रभागांच्या सीमांकनाची प्रक्रियाच २ मार्चपर्यंत चालणार आहे. हा टप्पा पार पडल्यानंतर संबंधित महापालिकांतील आरक्षणाची सोडत जाहीर करणे आणि आचारसंहिता असा कार्यक्रम असतो. त्यामुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील प्रभागांची संख्या नऊने वाढविण्यात आल्याने आता ती २२७ वरून २३६ झाली आहे. २३६ पैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतील, तर अनुसूचित जाती १५ आणि अनुसूचित जमातींसाठी २ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.
असा असेल कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार १ फेब्रुवारीला प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना
मागविण्याचा कालावधी आहे. २६ फेब्रुवारीला या हरकती-सूचनांवर सुनावणी घेतली जाईल. २ मार्चला याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करायचा आहे. मुंबईसह ठाणे आणि अन्य महापालिकांसाठीही असाच कार्यक्रम आहे.
ओबीसी आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निश्चित करीत ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. यानंतर राज्य सरकारने या मर्यादेत २७ टक्के आरक्षणाचा निर्णय दिला. मात्र, इम्पिरिकल डेटाशिवाय आरक्षण देता येणार नसल्याचे सांगत न्यायालयाने हा निर्णयही फेटाळून लावला आहे. यासंदर्भातील सुनावणीनंतर ओबीसी आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
प्रशासक की मुदतवाढ?
विद्यमान नगरसेवकांचा कालावधी संपण्यापूर्वी निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे महापालिकेत प्रशासकांची नेमणूक केली जाणार की नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार, याबाबतची उत्सुकता आहे. सध्या नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि पनवेल महापालिकेत प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका आणि कार्यकाळ
मुंबई (८ मार्च २०२२), ठाणे (५ मे २०२२), नवी मुंबई (८ मे २०२०), कल्याण- डोंबिवली (१० नोव्हेंबर २०२०), पुणे (१४ मार्च २०२२), पिंपरी- चिंचवड (१३ मार्च २०२२), नाशिक (१४ मार्च २०२२), औरंगाबाद (२८ एप्रिल २०२०), नागपूर (४ मार्च २०२२), पनवेल (९ जुलै २०२२), वसई- विरार (२७ जून २०२०), कोल्हापूर (१५ नोव्हेंबर २०२०), भिवंडी- निजामपूर (८ जून २०२२), उल्हासनगर (४ एप्रिल २०२१), सोलापूर (७ मार्च २०२२), परभणी (१५ मे २०२२), अमरावती (८ मार्च २०२२), अकोला (८ मार्च २०२२), चंद्रपूर (२८ मे २०२२), लातूर (२१ मे २०२२). जर पालिका निवडणूक एप्रिल अखेरीस किंवा मे मध्ये झाली, तर जून-जुलैत मुदत संपणाऱ्या पालिकांचाही त्यात समावे्श होणार का, याबाबत अद्याप संभ्रम आहे.
नव्याने सीमांकन, प्रारूप आराखडा
राज्य मंत्रिमंडळाने मुंबईतील वॉर्डांची संख्या वाढविणे आणि अन्य महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातील कायदेशीर दुरुस्त्या पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने नव्याने सीमांकन, प्रारूप आराखड्याचा कार्यक्रम निश्चित केला होता.