ऊर्जामंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा; संपूर्ण वीज बिल एकाचवेळी भरल्यास मिळेल २ टक्के सूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 05:44 PM2020-06-30T17:44:12+5:302020-06-30T17:45:01+5:30

मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम  निर्माण झाला आहे. वीजबिलावरील आकडा पाहून वीज ग्राहक मेटाकुटीला आले आहेत.

Maharashtra Lockdown: Energy Minister Nitin Raut gives relief to people on Inflated electricity bills | ऊर्जामंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा; संपूर्ण वीज बिल एकाचवेळी भरल्यास मिळेल २ टक्के सूट!

ऊर्जामंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा; संपूर्ण वीज बिल एकाचवेळी भरल्यास मिळेल २ टक्के सूट!

googlenewsNext

मुंबई : जून महिन्यात आलेल्या वीज बिलांमुळे वीज ग्राहकांना घाम फुटला असून, वीज ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. मात्र या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. विविध आघाड्यांवर नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून, संपूर्ण वीज बिल एकत्रित भरल्यास दोन टक्क्यांची सूट दिली जाईल, अशी घोषणाच नितीन राऊत यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेमुळे शॉक बसलेल्या वीज ग्राहकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम  निर्माण झाला आहे. तो लवकरात लवकर दूर करण्याच्या दृष्टीकोनातून नितीन राऊत हे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सवांद साधत आहेत. लॉकडाउनच्या काळातील  वीज बिल भरणा प्रमाण अत्यंत कमी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत, वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करणार करत आहेत. लॉकडाउनमुळे ग्राहकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना अतिरिक्त भुर्दंड पडू नये. तसेच त्यांना वीज बिल भरण्यासाठी जास्तीत जास्त सवलत कशा पद्धतीने देता येइल यादृष्टीने निर्णय घेतले जात आहेत. बिलाबाबत ग्राहकांचे समाधान होण्यासाठी ग्राहकांशी प्रत्यक्ष अधिकाधिक संवाद वाढविला जात आहे.  वीज बिल सोप्या भाषेत समजावून सांगितले जात आहे. यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा प्रभावी वापर केला जात आहे. जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीज बिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन, तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहे. मेळाव्यांसह वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत वीजग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. मात्र या कालावधीत महावितरणच्या आवाहनानुसार स्वत:हून मीटर रिडींग पाठविणा-या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. आता जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित व अचूक बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. या बिलामध्ये ग्राहकांवर एका पैशाचाही भूर्दंड बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येत आहे. चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

.........................

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या, मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहेत.

..........................

शहरी भागात मोठमोठया रहिवासी क्षेत्रांत किंवा सोसायटयांमध्ये आणि ग्रामीण भागात गाव किंवा वाडी पातळीवर ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून वीजबिलांबाबत संभ्रम व तक्रारी दूर करण्यात येणार आहेत. ग्राहक तक्रार निवारण कक्ष व मेळावे घेताना कोविड-१९ बाबत सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.

Read in English

Web Title: Maharashtra Lockdown: Energy Minister Nitin Raut gives relief to people on Inflated electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.