Maharashtra Lockdown : साडेतीन लाखांहून अधिक मजुरांनी सोडली मुंबई, ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 01:25 AM2021-04-17T01:25:16+5:302021-04-17T06:43:51+5:30
Maharashtra Lockdown: प्रवाशांची गर्दी वाढल्याने उन्हाळ्यातील विशेष गाड्यांसह पुरेशा गाड्या उपलब्ध असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही. एप्रिल महिन्यासाठी ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे आणि ही संख्या आणखी वाढविण्यात येईल.
मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊन लावण्यात आले आहव त्यामुळे मजुरांसमोर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी, लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आपल्या गावी चालले आहेत. मध्य रेल्वे दररोज मुंबईते देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात सरासरी २८ गाड्या चालवत असून १४ दिवसात साडेतीन लाखाहून अधिक मजुरांनी गाव गाठले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
प्रवाशांची गर्दी वाढल्याने उन्हाळ्यातील विशेष गाड्यांसह पुरेशा गाड्या उपलब्ध असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही. एप्रिल महिन्यासाठी ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे आणि ही संख्या आणखी वाढविण्यात येईल. याशिवाय, सीआर दररोज १८ नियमित प्रवासी गाड्या चालवत राहील. १ ते १४ एप्रिल दरम्यान सुमारे ३.५ लाख लोकांनी त्यांच्या मूळ शहरांमध्ये प्रवास केला आहे. प्रत्येक आउटस्टेशन ट्रेनमध्ये सुमारे १,४०० लोक प्रवास करत असतात. महिन्याच्या अखेरीस, सीआर गाड्यांमध्ये आणखी चार लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी सहा लाख स्थलांतरितांना त्यांच्या मूळ शहरांमध्ये नेण्यासाठी ४०० श्रमिक विशेष गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.अनेक गाड्या उत्तर व पूर्वेकडील ठिकाणांची आहेत. उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नियमित रेल्वेगाड्या सोडण्याशिवाय मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर क्षेत्रांतून ७ एप्रिल ते १५ एप्रिल आतापर्यंत ७६ उन्हाळी विशेष गाड्या उत्तर व पूर्वेकडील गंतव्यस्थानांकरिता चालविल्या आहेत.
७६ विशेष गाड्या
उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नियमित रेल्वेगाड्या सोडण्याशिवाय मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर क्षेत्रांतून ७ एप्रिल ते १५ एप्रिल आतापर्यंत ७६ उन्हाळी विशेष गाड्या उत्तर व पूर्वेकडील गंतव्यस्थानांकरिता चालविल्या आहेत.
गंतव्य ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या वेळेवर जाहीर केल्या जातील. गेल्या काही दिवसांपासून गावी परतणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे.
रिक्षाचालकांची चांदी
पनवेल रेल्वे स्थानकात येण्यासाठी पनवेल परिसरासह ग्रामीण भागातील प्रवासी रिक्षाचा आधार घेत आहेत. त्यानुसार लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांना चार दिवसांपासून चांगलीच मागणी वाढली आहे.
शुक्रवारी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकात गर्दी वाढल्याने रिक्षाचालकांना चांगलाच व्यवसाय झाला. विना तिकीट आलेले प्रवाशांना प्रवेश दिला जात नसल्याने, परत आपल्या माघारी जात आहेत. तर पुढील दिवसाच्या तिकीटासाठी धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळाले.