Maharashtra Lockdown: पुण्यातील डॉक्टरांची 'मात्रा लागू पडली'; सरकारने 'लॉकडाऊन'ऐवजी 'निर्बंधां'ची घोषणा केली!
By प्राची कुलकर्णी | Published: April 5, 2021 11:34 AM2021-04-05T11:34:18+5:302021-04-05T11:40:17+5:30
आता लोकांनीच नियम पाळणे गरजेचे नाहीतर पूर्ण लॉकडाऊन ची वेळ येईल साळुंके यांचा इशारा
पुण्या पाठोपाठ राज्यामध्येही आता निर्बंध वाढवण्यात आले आहेत. दिवसभरात बाहेर पडता येण्याची परवानगी सोडली तर हे नियम जवळपास लॉकडाउनच्या जवळ जाणारे आहेत. पण याला लॉकडाऊन असे थेट म्हणू नका असा सल्ला राज्य सरकारला दिला होता तो सार्वजनिक आरोग्याचे तज्ञ आणि राज्य सरकार चे कोरोना विषयक सल्लागार डॉक्टर सुभाष साळुंके यांनी. पुण्यामध्ये गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही सूचना मांडली आणि त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव यांच्याशीही याबाबत चर्चा केली.
नियम इतके कडक आणि लॉकडाऊन च्या जवळ जाणारे असताना हा शब्द वापरण्याचे टाळण्याची त्यांची भूमिका काय होती याबाबत विचारले असता साळुंके म्हणाले ," सध्या लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. पण लॉकडाऊन या शब्दाची लोकांना ॲलर्जी आहे. त्यामुळे मी अकबर बिरबल आणि पोपटाच्या गोष्टी चे उदाहरण दिलं होतं. म्हणजे पोपट मेलाय असं म्हटलं तर बादशहा फासावर लटकवणार. त्यामुळे पोपट पाणी पीत नाही ,पोपट खात नाही असं म्हणत राहायचं. निर्बंध कडक करायचे पण त्याला लॉकडाऊन म्हणायचे नाही. "
लोकांनी विनाकारण बाहेर पडणं बंद करावं हे यामागचे उद्दिष्ट असल्याचे साळुंके म्हणाले ," लोक नियम पाळत नाहीयेत. बाजारात ,इतर ठिकाणी गर्दी करणे सुरू आहे. अगदी माझ्या घराजवळ सुद्धा मी सध्या रिक्षावाले उभे असताना मास्क घालत नाहीत, रस्त्यावर थुंकतात हे पाहतो. बाजारांमध्ये ही मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. यामुळेच ही वेळ आली आहे. लोकांनी नियम पाळले असते तर गोरगरिबांच्या पोटावरती पाय देण्याची वेळ आलीच नसती. आता लोक सरकार आणि प्रशासनाला नाव ठेवतात पण ते केवळ राजकारण आहे. "
सुरुवातीला याबाबत पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत साळुंके यांनी ही भूमिका मांडली होती आणि त्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याशीही याबाबत चर्चा केली. नियमांमुळे त्रास होणार आहे पण आत्ताची परिस्थिती लक्षात घेता थोडं सहन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पण या निर्बंधांचा नेमका किती फरक पडेल हे विचारल्यावर साळुंके म्हणाले ," सध्या रुग्ण संख्या कमी करणे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे. या नियमांमुळे ती १० ते २०% कमी होईल असा अंदाज आहे. यामुळे सध्याची बेडची मागणी घटेल त्याच बरोबर गंभीर रुग्णांची संख्या घटेल असा अंदाज आहे. परिणामी एकूण मृत्यू कमी करणे शक्य होईल."
अर्थात लोकांनी या नियमांचे पालन केले तरच हे शक्य असल्याचं साळुंके म्हणाले. "एकीकडे निर्बंध वाढवायचे आणि दुसरीकडे चाचण्या आणि लसीकरण वाढवायचं यातून मोठ्या प्रमाणावर फरक पडेल. मात्र लोकांनी ऐकलं नाही तर आणखी कडक संपूर्ण लॉकडाऊन लावायला पर्याय राहणार नाही. त्यामुळे जे निर्बंध आहेत ते पाळणे अत्यंत आवश्यक आहे. 30 एप्रिल पर्यंत हे नियम आहेत. सार्वजनिक आरोग्य तज्ञ म्हणून मला हेच आवश्यक असल्याचं दिसतंय. थोडे सहन करा तरच परिस्थिती सुधारेल" असं मत त्यांनी व्यक्त केलं.