माढ्यात भाजपाचा आणखी एक बडा नेता नाराज, मोहिते पाटलांना पाठिंबा देणार की फडणवीसांची शिष्टाई कामी येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:48 AM2024-04-15T09:48:16+5:302024-04-15T09:49:00+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघ हा भाजपासाठी मोठी ठरला आहे. येथे भाजपाने (BJP) दिलेल्या उमेदवारावरून पक्षासह मित्रपक्षांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. मोहिते पाटलांनंतर भाजपामधील उत्तम जानकर (Uttam Jankar) हेही नाराज असल्याची चर्चा आहे.
या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघ हा भाजपासाठी मोठी ठरला आहे. येथे भाजपाने दिलेल्या उमेदवारावरून पक्षासह मित्रपक्षांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. माढ्यामध्ये भाजपाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेल्या उमेदवारीला भाजपामधूनच धैर्यशिल मोहिते पाटील यांनी विरोध केला होता. तसेच लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या धैर्यशिल मोहिते पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवत रविवारी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तसेच आता त्यांना माढ्यामधून उमेदवादी मिळणार हेही निश्चित आहे. त्यातच आता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभाव असलेला आणखी एक नेता भाजपामध्ये नाराज झाला आहे.
माढ्यातील भाजपा नेते उत्तम जानकर हे नाराज झाले असून, ते मोहिते-पाटील यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र उत्तम जानकर यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना भेटीसाठी बोलावले असून, आज जानकर हे देवेंद्र फडणवीस आणि नंतर अमित शाह यांची भेट घेणार आहेत. तसेच देवेंद्र फणडवीस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जानकरांना शब्द दिल्याचीही चर्चा आहे. मात्र या भेटीगाठीनंतरही जानकर यांची नाराजी दूर न झाल्यास भाजपासाठी माढ्याची लढाई आणखीनच कठीण होणार आहे.
दरम्यान, उत्तम जानकर आपली नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, भाजपाकडे मी सोलापूर लोकसभेची उमेदवारी मागितली होती. माझ्या नावाची चर्चाही होती. परंतु तिथे मला उमेदवारी न दिल्याने सोलापूरमध्ये वातावरण तापलं आहे. पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी माझ्याऐवजी राम सातपुतेंना उमेदवारी दिली गेली होती. त्यामुळे यावेळी सोलापूरमध्ये मला उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होता. मात्र यावेळीही माझी संधी डावलली गेली. या प्रकारामुळे आमचे समाजबांधव नाराज झाले आहेत. तसेच कुणाचंही काम करायचं नाही या मानसिकतेपर्यंत मी आलो आहे, असे उत्तम जानकर म्हणाले.
तसेच शरद पवार यांना पाठिंबा देण्यच्या निर्णयाबाबत उत्तम जानकर म्हणाले की शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हा नंतरचा विषय आहे. आज होणाऱ्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो तो पाहणार आहे. त्यात सकारात्मक तोडगा निघाला तर ठिक आहे. नाहीतर मग कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल, असे संकेत जानकर यांनी दिले.