भाजपातील आणखी एक नाराज शरद पवार गटाच्या गळाला? जयंत पाटील यांनी केली बंद दाराआड चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:50 AM2024-04-12T11:50:06+5:302024-04-12T11:51:30+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: काल माढ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या धैर्यशिल मोहिते पाटील यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपाची साथ सोडली होती. त्यानंतर आता भाजपाला (BJP) आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा उद्रेक होत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उमेदवारी नाकारण्यात आलेले जळगावमधील खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. तर काल माढ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या धैर्यशिल मोहिते पाटील यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपाची साथ सोडली होती. त्यानंतर आता भाजपाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपा समर्थक असलेले इचलकरंजीचे आपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे भाजपावर नाराज असून, त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील रिंगणात आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हेही रिंगणात उतरले आहेत. तसेच वंचितनेही येथे आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे येथे चौरंगी लढत होत असल्याने मतदारसंघातील आपापल्या भागात प्रभाव असलेल्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची बाजू भक्कम करण्यासाठी जयंत पाटील यांनी भेटीगाठींचं सत्र सुरू केलं आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली आहे.
प्रकाश आवाडे हे हातकणंगलेमधून त्यांच्या मुलासाठी भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक होते. तसेच त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटला, तसेच त्यांनी येथून विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे प्रकाश आवाडे नाराज झाले होते.
दरम्यान, जयंत पाटील यांनी शिंदे गटाचे समर्थक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचीही भेट घेतली. शिरोळचे अपक्ष आमदार असलेले यड्रावकर हेसुद्धा त्यांच्या भावासाठी लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते. मात्र जयंत पाटील यांनी घेतलेल्या या दोन्ही भेटींमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र समोर येऊ शकलेले नाही.