नवनीत राणांना उमेदवारी जाहीर होताच महायुतीत वादाचा स्फोट, बच्चू कडूंनी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 08:03 PM2024-03-27T20:03:18+5:302024-03-27T20:05:42+5:30
Lok Sabha Election 2024: भाजपाने अमरावती येथून नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर करताच महायुतीमध्ये (Mahayuti) वादाचा स्फोट झाला आहे. सुरुवातीपासूनच नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध करत असलेल्या बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमधून मागची पाच वर्षे भाजपा समर्थक खासदार म्हणून काम करणाऱ्या नवनीत राणा यांना पक्षाच्या चिन्हावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र भाजपाने अमरावती येथून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करताच महायुतीमध्ये वादाचा स्फोट झाला आहे. सुरुवातीपासूनच नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध करत असलेल्या बच्चू कडू यांनी आता अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. राणा यांना उमेदवारी जाहीर होताच प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी आपला राणा यांना असलेला विरोध कायम असल्याचे सांगत आपण लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, नवनीत राणा यांना आमचा विरोध कायम आहे आणि हा विरोध कायम राहील. नवनीत राणांच्या उमेदवारीला असलेल्या विरोधाबाबत आम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आता आम्ही नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार देऊ, त्यासाठी आमच्याकडून चाचपणी सुरू आहे. राणांविरोधात उमेदवार देण्यात फायदा आहे की नाही हे आम्ही पडताळून पाहत आहोत. मात्र आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार अजिबात करणार नाही.
आमदार रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्या पराभवाचा वचपा काढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांना पराभूत केले होते. मात्र राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लोकसभेची निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली होती.