मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 05:21 PM2024-05-06T17:21:45+5:302024-05-06T17:22:13+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: काही संकट आलं तर उद्धव ठाकरे यांच्या मदतीला जाणारी पहिली व्यक्ती मी असेन, असं विधान मोदींनी केलं होतं. त्यामुळे भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यात निर्माण झालेली कटुता कमी होऊन दोघेही पुन्हा एकत्र येतील का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला होता. या प्रश्नाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबाबत प्रेम व्यक्त केले होते. तसेच काही संकट आलं तर उद्धव ठाकरे यांच्या मदतीला जाणारी पहिली व्यक्ती मी असेन, असं विधान केलं होतं. त्यामुळे भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यात निर्माण झालेली कटुता कमी होऊन दोघेही पुन्हा एकत्र येतील का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला होता. या प्रश्नाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान मोदींनी प्रेम व्यक्त केल्याने आता उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा एकदा युती होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा आमचा शिवसेनेबरोबर टोकाचा संघर्ष सुरू होता. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रश्मी ठाकरे यांना सातत्याने फोन करून उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचा विचारपूस करत होते. ही माणुसकी आहे. आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. तर राजकीय आणि वैचारिक विरोधक आहोत. त्यामुळे मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर कुठलीही अडचण निर्माण झाल्यास आपण मदत करू, असे सांगितले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा युती होण्याबाबत म्हणाल तर तसं होण्याची शक्यता मला दिसत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाला किती जागा मिळणार याचं उत्तरही फडणवीस यांनी दिलं आहे. ते म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळतील, याबाबत सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून दावे केले जात आहेत. मला ही खात्री आहे की, जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे. मोदींचा १० वर्षांत रेकॉर्ड बघितल्यानंतर २०१९ मधील जागा तर आम्ही राखू. त्यापेक्षा अधिक म्हणजे ४० पेक्षा जास्त जागा नक्कीच जिंकू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.