उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 10:25 AM2024-05-05T10:25:08+5:302024-05-05T10:26:37+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेवेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सिंघम स्टाईलमध्ये भाजपा, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा समाचार घेतला. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही उद्धव ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर दिले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास १३ मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे हे दोन गट एकमेकांच्या आमने-सामने आले आहेत. पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच एका मोठ्या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत होत असल्याने चुरस वाढली असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, काल धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेवेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंघम स्टाईलमध्ये भाजपा, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा समाचार घेतला. तर एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर दिले.
धाराशिवमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, इतर वेळेला क्षुल्लक वाटणाऱ्या या माणसांसमोर तुम्ही का झुकताय. मतांची भीक का मागताय. आता तुमची पाळी, काय म्हणतात ते आली रे आली आता तुमची पाळी आली. तुम्ही काय करायचं तुम्ही सिंघम व्हायचं आणि म्हणायचं आता माझी सटकली. आता आम्ही तुम्हाला मत नाही देणार. आता माझी सटकली आणि तुम्हालाही इथून सटकवणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
दरम्यान, उद्धव ठाकरे अडचणीत आल्यास मी त्यांच्या मदतीला जाणारा मी पहिली व्यक्ती असेन, असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. नरेंद्र मोदींवर कुठलं संकट आलं तर मी त्यांच्या मदतीला जाईल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. फेसबूक लाईव्ह करून सटकली वाटतं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी आता माझी सटकली म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लगावला.