'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:30 AM2024-05-09T10:30:05+5:302024-05-09T10:32:51+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीवेळी सगळेच आय लव्ह यू म्हणत असतात, शत्रूही मित्र होतात. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी आय हेट यू सुरू होतं, असं विधान गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता गुलाबराव पाटील यांचा नेमका रोख कुणाकडे होता, याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रातील २४ जागांवरील मतदान आटोपल्यानंतर आता मुंबई, पुणे नाशिक आणि मराठवाड्यातील भागातील प्रचाराकडे राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केलं आहे. दरम्यान, जळगावमध्ये एका मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी सगळेच आय लव्ह यू म्हणत असतात, शत्रूही मित्र होतात. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी आय हेट यू सुरू होतं, असं विधान गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता गुलाबराव पाटील यांचा नेमका रोख कुणाकडे होता, याची चर्चा सुरू झाली आहे.
जळगावमध्येभाजपा उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी झालेल्या मेळाव्यावेळी गुलाबराव पाटील यांनी हे विधान केलं. त्यावेळी स्मिता वाघ आणि भाजपा नेते गिरीश महाजन हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्या आपल्या निवडणुकीवेळी भाऊ सगळे आपल्या विरोधात असतात. मात्र खासदारकीच्या दुश्मन के दुश्मन सुद्धा दोस्त बनून जातात. बघा आता शिरीशदादा आणि अनिलभाऊ आय लव्ह यू, तिकडे गेलो तर किशोर आप्पा आणि अमोल शिंदे आय लव्ह यू, गुलाबराव पाटील आणि चंद्रशेखर अत्तरडे आय लव्ह यू. ही गटार, वॉटर, मीटरची निवडणूक नाही आहे. ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे. ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे. ही देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक असल्यामुळे आमची जरी तोंड वाकडी असली तरी देशाच्या नेतृत्वाकरीता आम्ही एकत्र येऊन देशाचं नेतृत्व ठरवतो, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
खासदार झाल्यावर स्मिताताईंना आमची एवढीच विनंती राहणार आहे की, कॅबिनेट मंत्री अमळनेरचा, खासदार अमळनेरचा, आमच्याकडे थोडं लक्ष ठेवा. रस्त्यावरून धरणगाववरून जेव्हा ट्रेन येते, तेव्हाच ती अमळनेरला पोहोचते. तुम्ही जर कामामध्ये टाळाटाळ केली. तर अमळनेरला ट्रेन पोहोचू देणार नाही. एवढी दादागिरी मी करू शकतो, मदत, पुनर्वसन मंत्र्यांनी मतद पुनर्वसनच करावं आणि खासदारताईंनी आमच्याकडे लक्ष ठेवावं, असा इशाराही गुलाबराव पाटील यांनी दिला.