मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 03:17 PM2024-05-05T15:17:36+5:302024-05-05T15:20:15+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी कीर्तिकुमार शिंदे यांच्या हाती शिवबंधन बांधत त्यांना पक्षाचं सदस्यत्व बहाल केला.
मागच्या महिन्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्वाचं समर्थन करत राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कीर्तिकुमार शिंदे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी कीर्तिकुमार शिंदे यांच्या हाती शिवबंधन बांधत त्यांना पक्षाचं सदस्यत्व बहाल केला.
ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर कीर्तिकुमार शिंदे यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात ते म्हणाले की, ‘’शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मी 'मातोश्री' येथे शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मला शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपूर्वीच्या आमच्या भेटीचा त्यांनी आठवणीने उल्लेख केला आणि त्यांच्या मनातील एक विषयही आवर्जून मला सांगितला. मला शिवसेनेत कोणतं पद मिळेल, याबाबत एका शब्दाचीही चर्चा न करता उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे कीर्तिकुमार शिंदे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आज देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश- सगळीकडेच अनेक राजकीय पक्षांचे पुढारी हुकूमशाही मनोवृत्तीच्या भाजप-मोदी-शाह यांच्यासमोर अक्षरशः लोटांगण घालत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र भाजपविरोधात संघर्ष करत महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा स्वाभिमानी बाणा जपत आहे. सर्व समाजघटकांना स्वाभिमानाच्या आणि समतेच्या लढ्यातील सोबती मानणारे प्रबोधनकार ठाकरे यांचे व्यापक बहुजनवादी हिंदुत्व, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळापर्यंत बांधलेली शि व से ना ही चार अक्षरांची अत्यंत बळकट 'जादुई' संघटना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुकूमशाह 'भामोशा' विरोधातील आपली परखड राजकीय भूमिका महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे घेत असलेले अतुलनीय, कठोर परिश्रम यांमुळे लोकसभा निवडणुकीत ही सच्ची शिवसेना आणि महविकास आघाडी दणदणीत यश तर मिळवेलच, पण त्याच बरोबर देशाच्या राजकारणालाही नवीन दिशा देईल याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास कीर्तिकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.