"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 01:34 PM2024-04-27T13:34:19+5:302024-04-27T13:36:09+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कोल्हापूरमधून उमेदवार उभं करणंच चूक आहे. भाजपाकडून नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे शाहूंच्या विरोधात प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते हे महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज कोल्हापुरात होत आहे. मोदींच्या या प्रचारसभेसाठी महायुतीमधील घटक पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, कोल्हापूरमध्ये प्रचारासाठी येत असलेले नरेंद्र मोदी आणि भाजपावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. शिवरायांच्या गादीविरोधात प्रचारासाठी मोदी कोल्हापुरात येत आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.
मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, ज्या शाहू महाराजांनी राज्य आणि देशाला पुरोगामी विचार दिला. जे शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी येताहेत हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही. छत्रपती शाहू आणि त्यांच्याआधीचे सगळे या गादीचे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान आहे. त्यामुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कोल्हापूरमधून उमेदवार उभं करणंच चूक आहे. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातील शाहू, फुले, आंबेडकरांच्या परंपरेचा सन्मान करावा, अशी आमची इच्छा होती. कोल्हापूरची जागा शिवसेनेची होती. तरी आम्ही शाहू महाराज निवडणुकीला उभे राहताहेत हे ऐकल्यावर ती जागा त्यांच्यासाठी सोडली. पण भाजपाकडून नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येताहेत. नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते हे महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.
यावेळी मान गादीला मत मोदीला या प्रचाराबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, गादीपुढे मोदी कुणी नाही. कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाही. ही मोदी बसतात ती गादी नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे. भाजपा त्या गादीचा अपमान करत आहे. मानही गादीला आणि मतही गादीला ही कोल्हापूरकरांची घोषणा आहे. मोदी आणि त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात पूर्ण कार्यक्रम करायचा, हे कोल्हापूरकरांनी ठरवलंय, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.