विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:34 AM2024-05-10T10:34:14+5:302024-05-10T10:55:07+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दार असा उल्लेख करत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका केल्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनीही त्यांच्यावर टीका केली होती. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मोठं विधान केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबई आणि आसपासच्या भागातील बहुतांश मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यापैकी अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येणार असल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. तसेच दोन्ही बाजूंनी एकमेकांवरून बेछूट आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दार असा उल्लेख करत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका केल्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनीही त्यांच्यावर टीका केली होती. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मोठं विधान केलं आहे. विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला आहे, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊन असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
ठाकरे गटाकडून होत असलेल्या बेलगाम आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला आहे. ही आमची महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी हे शिकवलेलं नाही. तसेच आम्ही या टीकेला कामाच्या माध्यमातून उत्तर देऊ, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, त्यांचा तोल ढासळला आहे. त्यांचा आत्मविश्वास हरवला आहे. तसेच त्यांच्या पायाखालची वाळूही सरकली आहे. तसेच त्यांना रात्रंदिवस, उठता बसता एकनाथ शिंदेशिवाय दुसरा कुणी दिसत नाही आहे. मी मुख्यमंत्री बनलो हेही त्यांना पचलेलं नाही. शेतकऱ्याचा मुलगा कसा काय मुख्यमंत्री बनू शकतो, हा प्रश्न त्यांना पडला आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलाच मुख्यमंत्री बनेल, अशी त्यांची धारणा होती. मात्र मी मुख्यमंत्री बनलो. आता जनता माझ्यासोबत आहेत. माझ्यावर प्रेम करतात, हे त्यांना सहन होत नाही आहे. त्यामुळे रोज काही ना काही बडबड सुरू असते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.