शरद पवार गटाच्या चिन्हावर मी निवडणूक लढणार नाही, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:51 AM2024-04-02T11:51:52+5:302024-04-02T11:52:53+5:30
Satara Lok Sabha Constituency:: काही अंदाज वर्तविले जातात. मी राष्ट्रवादीचे चिन्ह घेईन का? पण, ते आता शक्य नाही; मी काँग्रेस पक्षाचेच काम करत राहणार. जर त्यांनी यामध्ये काही पर्याय काढला, मला सांगितले, आदेश दिला तर माझी निवडणुकीची तयारी आहे, असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले.
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे आहे. मतदारसंघातून भाजपला रोखणारा सक्षम उमेदवार असावा, अशी भावना आहे. शेवटी उमेदवार निवडीचा निर्णय त्यांचा आहे. तरीही मतदारसंघ लढविण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडे आल्यास त्यावर विचार करू. पर्याय काढून पक्षाने आदेश दिल्यास माझीही निवडणूक लढण्याची तयारी आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी स्पष्ट केले.
सातारा काँग्रेस कमिटीत पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार कोण असावा, याविषयी चर्चा होत आहेत. याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही माझ्याशी भेट झाली. मतदारसंघ त्यांच्याकडेच असल्याने शरद पवार यांनीच उमेदवाराबाबत निर्णय घ्यायचा आहे. फक्त भाजपला रोखून ठेवणारा सक्षम उमेदवार असावा, ही भावना आहे. आम्ही शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत.
दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जागेसंदर्भात निर्माण झालेल्या पेचावर शरद पवार दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करून मार्ग काढतील, असे पवार गटातील एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
काही अंदाज वर्तविले जातात. मी राष्ट्रवादीचे चिन्ह घेईन का? पण, ते आता शक्य नाही; मी काँग्रेस पक्षाचेच काम करत राहणार. जर त्यांनी यामध्ये काही पर्याय काढला, मला सांगितले, आदेश दिला तर माझी निवडणुकीची तयारी आहे.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.