संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वेडे झालेत, ते काहीही बोलतात, नारायण राणेंची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 09:26 AM2024-04-18T09:26:47+5:302024-04-18T09:27:42+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे वेडे झाले आहेत. ते काहीही बोलत असतात, असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे वेडे झाले आहेत. ते काहीही बोलत असतात, असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे.
भाजपाला मिळणाऱ्या जागांबाबत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दाव्याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत काहीही बोलत असतात. भाजपाला २०० जागा मिळणार नाहीत, अमित शाह तडीपार वगैरे. संजय राऊत पंतप्रधानांबाबत काहीही बोलतात आणि प्रसारमाध्यमे दाखवतात. संजय राऊत आणि उद्धवव ठाकरे वेडे झाले आहेत. ते काहीही बोलत असतात, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
यावेळी नारायण राणे यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यावरही टीका केली. सध्या काँग्रेसचे जेमतेम ५० खासदार आहेत. आमचे ३०३ आहेत. आम्ही ४०० हून अधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय. मग यांची सत्ता कशी येणार? त्यामुळे १ लाख रुपये देऊ वगैरे जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने ह्या थापा आहेत. काँग्रेस काही देऊ शकत नाही. त्यांची तेवढी क्षमता नाही. काँग्रेसची सत्ता होती तेव्हा काही का दिलं नाही? असा सवालही नारायण राणे यांनी विचारला.
तसेच यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जनतेची श्रीरामांप्रमाणे सेवा करायची आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज रामनवमी आहे. मी रामाचा सेवक आहे. माझा जन्म हनुमान जयंतीदिवशीचा आहे. प्रभू श्रीराम ज्या प्रमाणे जनतेसाठी झटले. त्याप्रमाणे मला जनतेची सेवा करायची आहे. लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे. तेव्हा इथला खासदार असला तर इथल्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा नारायण राणे यांनी व्यक्त केली.