‘माझ्याकडून एक चूक झाली’, त्या निर्णयासाठी शरद पवार यांनी मागितली अमरावतीकरांची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 02:06 PM2024-04-22T14:06:01+5:302024-04-22T14:06:56+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: आज अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये (Amravati Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीच्या प्रचारसभेसाठी आलेल्या शरद पवार यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मागच्या वेळी आमच्याकडून अमरावतीमध्ये एक चूक झाली होती, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. आता ती चूक दुरूस्त करायची आहे, असं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं.
मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याच्या बळावर नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. मात्र या विजयानंतर राणा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. तसेच नवनीत राणा ह्या यावेळी भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, आज अमरावतीमध्येमहाविकास आघाडीच्या प्रचारसभेसाठी आलेल्या शरद पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मागच्या वेळी आमच्याकडून अमरावतीमध्ये एक चूक झाली होती, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. आता ती चूक दुरूस्त करायची आहे, असं विधान शरद पवार यांनी केलं. राज्यातील विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीची प्रचारसभा आज अमरावती येथे झाली. या प्रचारसभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, यशोमती ठाकूर आदी मविआचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी मतदारांना संबोधित करताना हे विधान केलं.
शरद पवार महाविकास आघाडीच्या प्रचारसभेला संबोधित करताना म्हणाले की, आज मी इथे आलो आहे ती एक गोष्ट सांगण्यासाठी की, मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. एक चूक माझ्याकडून झाली. पाच वर्षांपूर्वीची लोकसभेची जी निवडणूक होती त्यावेळी लोकसभेच्या उमेदवारांन मतदान करा, म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं. मात्र पाच वर्षांचा त्यांच्या अनुभव पाहिल्यानंतर कधीतरी इथे यावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, असं मला वाटत होतं. ही चूक पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे. ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि वैयक्तिक जीवन अत्यंत स्वच्छ आहे, अशा बळवंत वानखडे यांना तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही घणाघाती टीका केली. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशात जे जे पंतप्रधान झाले त्यांच्या कामाची पद्धत आम्ही पाहिलेली आहे. हे नेते देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे. भाषणं द्यायचे. त्या भाषणांमधून नवा भारत कसा उभा करायचा, यासाठी लोकांचा आत्मविश्वास कसा वाढेल, असा संदेश द्यायचे. आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंवर टीका करतात. काँग्रेसवर टीका करतात. मात्र जवाहरलाल नेहरूंचं योगदान देशाच्या इतिहासातून कुणीही पुसू शकणार नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.