शरद पवार यांनी सांगितले साताऱ्यातील संभाव्य उमेदवार, एक दोन दिवसांत होणार घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 02:42 PM2024-03-29T14:42:43+5:302024-03-29T14:44:46+5:30
मागच्या काही काळात बदलेल्या समिकरणांमुळे सातारा लोकसभा मतदारसंघात कोण आमने-सामने येणार याबाबत याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोण निवडणूक लढवणार याबाबतचे सूचक संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून ज्या मतदारसंघांमध्ये अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा. २०१९ मध्ये या मतदारसंघातील पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी भर पावसात दिलेलं भाषण चांगलंच गाजलं होतं. मात्र मागच्या काही काळात बदलेल्या समिकरणांमुळे येथे लोकसभा निवडणुकीत कोण आमने-सामने येणार याबाबत याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोण निवडणूक लढवणार याबाबतचे सूचक संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर आणि सुनील माने या संभाव्य नावांची चर्चा सुरू आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच उमेदवार म्हणून एका नावाची घोषणा येत्या एक-दोन दिवसांमध्ये केली जाईल, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
सातारा हा शरद पवार यांचा प्रभाव असलेल्या काही मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ मानला जातो. २०१४ आणि २०१९ च्या मोदीलाटेतही येथून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उदयनराजे भोसले हे निवडून आले होते. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती. तसेच त्यावेळी शरद पवार यांनी केलेल्या आक्रमक प्रचारामुळे उदयनराजे भोसले यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. मात्र येथील विद्यमान खासदार असलेले श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे शरद पवार हे आता येथून कुणाचं नाव उमेदवार म्हणून जाहीर करतात त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.