सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 03:12 PM2024-05-01T15:12:52+5:302024-05-01T15:13:47+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: महिन्यांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देणारे माजी आमदार परशुराम उपरकर हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ३ मे रोजी उद्धव ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा होणार आहे. त्या सभेवेळी परशुराम उपरकर हाती शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे.
कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये लढत होत आहे. दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याने मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा इथला प्रचार शिगेला पोहोचत आहे. दोन्ही उमेदवारांसाठी बडे नेते रत्नागिरी-सिंधुदुर्गात येत आहेत. दरम्यान, मतदानाला काही दिवस उरले असतानाच शिवसेना ठाकरे गटाला मोठं बळ मिळणारी बातमी समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देणारे माजी आमदार परशुराम उपरकर हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ३ मे रोजी उद्धव ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा होणार आहे. त्या सभेवेळी परशुराम उपरकर हाती शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे.
शिवसेना सोडल्यानंतर दीर्घकाळ राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये राहिलेल्या परशुराम उपरकर यांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्या या निर्णामुळे सिंधुदुर्गात मनसेला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर उपरकर यांच्या राजकीय वाटचालीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेरीस त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या सोबत जात ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत.
सिंधुदुर्गातील राजकारणात परशुराम उपरकर हे नेहमीच नारायण राणे यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तत्कालीन कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघात परशुराम उपरकर यांनी राणेंच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी नारायण राणेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्याने उपरकर यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यानंतर शिवसेनेने त्यांना विधान परिषेदवर संधी दिली होती. पुढे त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. तसेच बरीच वर्षे जिल्ह्यातील मनसेचं नेतृत्व केलं होतं.