उमेदवारी उशिरा जाहीर होणे भोवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:16 AM2024-06-11T11:16:55+5:302024-06-11T11:17:33+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: १५ जागांवर उमेदवार उभे केले, त्यापैकी सात जागांवर आमचा विजय झाला. त्या तुलनेत आमची कामगिरी चांगली राहिली. नवीन राजकीय समीकरणे होती. या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. मात्र, या सगळ्या निवडणुकीच्या काळात आमच्या उमेदवारांची उमेदवारी उशिरा घोषित होणे याचा आम्हाला जोरदार फटका बसल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. मनीषा कायंदे
(प्रवक्त्या, शिंदेसेना )
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधक आमच्यावर टीका करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात ते आठ जागांवर बोळवण केली जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, मुख्यमंत्री त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी १५ जागांवर उमेदवार उभे केले, त्यापैकी सात जागांवर आमचा विजय झाला. त्या तुलनेत आमची कामगिरी चांगली राहिली. नवीन राजकीय समीकरणे होती. या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. मात्र, या सगळ्या निवडणुकीच्या काळात आमच्या उमेदवारांची उमेदवारी उशिरा घोषित होणे याचा आम्हाला जोरदार फटका बसल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक अर्ज भरण्याच्या काही दिवस अगोदर आमच्याकडे उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे प्रचारासाठी खूप कमी वेळ उमेदवारांना मिळाला. विरोधकांनी त्यांचे उमेदवार महिनाभर आधीच जाहीर केले होते. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी चांगला वेळ मिळाला. ज्याठिकाणी आमच्या जागा आहेत, त्याठिकाणी सहकारी पक्ष त्या जागेची मागणी करत राहिले आणि तो तिढा सोडविण्यात वेळ गेला. या गोष्टींचा उमेदवार निवडीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आमच्या विद्यमान उमेदवारांबाबत नकारात्मक सर्वेक्षण असल्याचे सांगून आयत्यावेळी उमेदवार बदलायला लावले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्हाला त्रास झाला. हे सर्वेक्षण कोणी केले, कुठून केले, याबाबत मला काही माहीत नाही. मात्र या कारणांमुळेही अनेक ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाल्याचे दिसून आले आहे. जर पालघर, यवतमाळ, वाशिम याठिकाणी आमचे उमेदवार दिले असते तर आजचा निकाल वेगळा दिसला असता.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किती मराठी मते मिळाली, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
ठाकरे यांच्या पक्षाला अल्पसंख्याक समाजाची मते अधिक प्रमाणात मिळाली.
संविधान बदलणार हे चुकीच्या पद्धतीने ‘नॅरेटिव्ह’ विरोधकांनी जनमानसात तयार केले. त्याचाही फटका आम्हाला बसला.
सहकारी पक्ष म्हणून भाजपची चांगली साथ मिळाली. अजित पवार गटाचा किती फायदा झाला, हे तपासावे लागेल.
मुख्यमंत्र्यांनी सहकारी पक्षाचे सर्व उमेदवार निवडून यावेत, यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली होती.
लोकसभा निकालाचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
सजग राहावे लागेल
ज्या चुका लोकसभा निवडणुकीत झाल्या त्या टाळायच्या असतील तर नवीन रणनीती आखावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. तसेच पुन्हा अधिक जोमाने मेहनत करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणूक नजीकच आहे. या पार्श्वभूमीवर सजग राहून कष्ट घेऊ.