जागावाटपाचा गुंता सुटेना, महायुतीमध्ये या ११ जागांचा फैसला अद्याप बाकीच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 07:19 AM2024-04-04T07:19:45+5:302024-04-04T07:21:24+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024 : भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट या महायुतीला अद्याप ११ लोकसभा जागांचा फैसला करता आलेला नाही. त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कायम असून तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याबाबतची उत्सुकता कायम आहे.
मुंबई : भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट या महायुतीला अद्याप ११ लोकसभा जागांचा फैसला करता आलेला नाही. त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कायम असून तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याबाबतची उत्सुकता कायम आहे.
उत्तर-मध्य मुंबई : पूनम महाजन की आशिष शेलार की आणखी कोणी हा निर्णय भाजपला करता आलेला नाही.
उत्तर-पश्चिम मुंबई : जागा भाजपकडे की शिंदेसेनेकडे हा प्रश्न कायम आहे.
दक्षिण मुंबई : मनसेला जागा द्यायची, भाजपने लढायची की शिंदेसेनेला द्यायची हेही ठरता ठरत नाही.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदेसेनेचाच या जागेवर हक्क असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत तेच उमेदवार असतील असे संकेत दिले.
नाशिक : महायुतीसाठी सर्वांत डोकेदुखीचा विषय झाला. भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट तिघांच्याही दावेदारीने वाढलेले टेन्शन कायम आहे.
ठाणे : जागेवर भाजप अडला आहे, तिथे शिंदेसेनेचाही दावा आहे.
कल्याण : उमेदवारी श्रीकांत शिंदेंना देण्यात अडचणी येत आहेत.
पालघर : शिंदेसेनेच्या जागेवर भाजपनेही दावा सांगितला आहे.
औरंगाबाद : भाजप व शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
उस्मानाबाद : भाजप आणि अजित पवार गटालाही ही जागा हवी आहे.
सातारा : भाजपकडे जाणार हे जवळपास स्पष्ट असले तरी अधिकृत घोषणा झालेली नाही.