दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित...
By बाळकृष्ण परब | Published: April 28, 2024 12:13 PM2024-04-28T12:13:21+5:302024-04-28T12:23:54+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात एकेकाळी नारायण राणेंच्या (Narayan Rane) विरोधात भूमिका घेणारे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि नारायण राणेंचे झालेले मनोमीलन हे या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरले आहे. आता या मनोमीलनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार का? केसरकर यांची साथ मिळाल्यामुळे राणेंचा फायदा होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
- बाळकृष्ण परब
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघात अटीतटीच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण लढती रंगल्या आहेत. त्यात मागच्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली उलथापालथ, नेत्यांची सुरू असलेली फोडाफोडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीबाबतच उत्सुकता आणखीच वाढली आहे. त्यातून या निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघांच्या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. अशाच मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात लढत होत आहे. शिवसेना आणि ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यावेळी रिंगणात उतरल्याने येथील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यात दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने यावेळी एकेक मत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्यासाठी येथे स्थानिक पातळीवरील समीकरणांना फार महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामधून अनेक विरोधक मित्र बनल्याचे तर काही सहकारी विरोधी भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. या राजकीय बेरीज-वजाबाकीमध्ये एकेकाळी नारायण राणेंच्या विरोधात भूमिका घेणारे दीपक केसरकर आणि नारायण राणेंचे झालेले मनोमीलन हे या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरले आहे. आता या मनोमीलनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार का? केसरकर यांची साथ मिळाल्यामुळे राणेंचा फायदा होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना कोकणात नारायण राणेंच्या विरोधात वातावरण निर्माण झालं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या दीपक केसरकर यांनी ‘राजकीय दहशतवाद गाडण्यासाठी प्रसंगी धनुष्यबाण चालवावा लागेल’, असं विधान करत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या निलेश राणेंविरोधात भूमिका घेतली होती. परिणामी तेव्हा राणेंविरोधात भूमिका घेणाऱ्यांना संघटित रूप मिळून निलेश राणेंचा दारुण पराभव झाला होता. त्या पराभवानंतर राणे आणि केसरकर यांच्यातील राजकीय वैर हे दिवसेंदिवस वाढत गेले होते. सिंधुदुर्गामधील जनतेसाठी दादा आणि भाईंमधील हे राजकीय वैर नवं नव्हतं. एकीकडे नारायण राणे यांचं कोकणातील राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित होत असताना त्यांना सावंतवाडीमध्ये आव्हान देण्याचं काम दीपक केसरकर यांनी केलं होतं. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये नगर परिषदेपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत अनेक निवडणुकांत तेव्हा राजकीय जुगलबंदी रंगायची. पुढे २०११-१२ च्या सुमारास नगर परिषद निवडणुकीदरम्यान वेंगुर्ल्यात झालेल्या राड्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये उघड वादाला तोंड फुटले होते. त्याची परिणती केसरकर यांनी २०१४ च्या निवडणुकीत निलेश राणेंना उघड विरोध करण्यात झाली होती. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये एकत्र असतानाही भाजपा आणि राणेंनी केसरकरांविरोधात अपक्ष उमेदवाराला बळ देऊन केसरकरांचा वचपा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळीही केसरकर यांनी मोठ्या शिताफीने विजय मिळवला होता.
मात्र राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो असं म्हटलं जातं. राणे आणि केसरकर यांच्या राजकीय वैराबाबतही असंच झाल्याचं दिसतंय. जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर दीपक केसरकर यांनी ठाकरेंच्याविरोधात भूमिका घेत शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमधील वाद हळूहळू मिटू लागला. यादरम्यान, राणे आणि केसरकर यांनी एकमेकांच्या अनौपचारिक भेटीगाठी घेतल्या. तर लोकसभा निवडणुकीत राणेंच्या नावाचा विचार होऊ लागल्यापासून केसरकर यांनीही राणेंशी जुळवून घ्यायची भूमिका घेतली. आता लोकसभेला नारायण राणेंना पाठिंबा देऊन पुढे विधानसभेमध्ये आपला मार्ग मोकळा करून घेण्याची दीपक केसरकर यांची रणनीती असू शकते. तर राणेंनाही मताधिक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सावंतवाडीमध्ये सध्या महायुतींतर्गत झालेला विरोध परवडणारा नाही. त्यामुळे त्यांनीही आपल्यासोबतच्या केसरकरविरोधकांना तूर्तास शांत केलेलं आहे. तसेच सद्यस्थितीत राणे आणि केसरकर या दोघांचेही ठाकरे हे एकच राजकीय विरोधक असल्याने या दोघांनाही एकमेकांची राजकीय गरज आहे. त्यामुळे पुढचा काही काळ दोन्ही नेते सिंधुदुर्गाच्या राजकारणात एकमेकांना सांभाळून घेण्याची शक्यता आहे.
मागच्या दोन लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सावंतवाडीमध्ये केसरकर यांची राणेंच्या विरोधातील भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. २०१४ मध्ये केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही राणेंच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे या मतदारसंघातून निलेश राणे हे ४१ हजार मतांनी पिछाडीवर पडले होते. तर २०१९ मध्येही केसरकर यांनी शिवसेनेच्या विनायक राऊतांना जवळपास २९ हजार मतांची आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळे यावेळीही केसरकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता येथे सध्या अटीतटीची लढत दिसून येत आहे. एकीकडे नारायण राणेंच्या रूपात भाजपाने शक्तिशाली उमेदवार दिला असला तरी शिवसेना ठाकरे गटाकडेही येथे बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळे महायुतीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाठिंबा मिळवावा लागणार आहे. अशा परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकर यांचा पाठिंबा नारायण राणेंसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तसं पाहिल्यास दीपक केसरकर यांची लोकप्रियता ही दहा वर्षांपूर्वी होती तशी राहिलेली नाही. सलग १५ वर्षे आमदार असल्याने त्यांच्याबाबत काही प्रमाणात अँटी इन्कम्बन्सीही आहे. मात्र असं असलं तरी केसरकर यांना मानणारा एक मोठा वर्ग इथे आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपाची ताकद बऱ्यापैकी असली तरी मोठं मताधिक्य मिळवण्याच्या दृष्टीने केसरकर यांची साथ नारायण राणेंना उपयुक्त ठरू शकते.