शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 08:43 AM2024-04-30T08:43:08+5:302024-04-30T08:44:42+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील दोन टप्प्यांमधील मतदान आटोपल्यानंतरही महायुतीचे काही जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. दरम्यान, यातील काही जागा आता शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील दोन टप्प्यांमधील मतदान आटोपल्यानंतरही महायुतीचे काही जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. जागावाटपात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणाऱ्या जागांवर भाजपाकडून दावा करण्यात आल्याने या जागांवर तिढा निर्माण झालेला होता. दरम्यान, यातील काही जागा आता शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम आणि ठाणे या मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. तसेच या जागांवर शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव आणि उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर ठाण्यामधून नरेश म्हस्के आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र नाशिकच्या जागेबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला नाही.
दरम्यान, या तिन्ही जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरे गटाशी थेट सामना होणार आहे. ठाकरे गटाने दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तिकर आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे.