जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर रात्रीचा दिवस!, शिंदे-फडणवीसांमध्ये साडेतीन तास खलबते, ठरले काय ते कळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 07:04 AM2024-04-01T07:04:55+5:302024-04-01T07:05:52+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली.
मुंबई - महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली. बारामतीचा तिढा सुटल्यानंतर आता नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच अन्य मतदारसंघांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक पार पडली. काय ठरले की ठरले नाही, हे गुलदस्त्यातच आहे.
या बैठकीत ठाणे, कल्याण, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या चारही मतदारसंघांबाबत शिंदेसेना आग्रही असून, नेमका काय तोडगा काढता येईल, याची चाचपणी या बैठकीत झाली. यावेळी कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते.
- भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट हे तिघेही नाशिकसाठी दावेदार आहेत. भाजपचा उमेदवार कोण असेल, हेही स्पष्ट नाही, तर अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले आहे. शिंदेसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईत दोनदा शक्तिप्रदर्शन केले. शुक्रवारी गोडसे यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून आल्यानंतर हनुमानाला साकडे घातले.
‘वंचित’च्या दुसऱ्या यादीत ११ उमेदवार
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यानंतर वंचितच्या उमेदवारांची संख्या १९ वर पोहोचली आहे.
दुसऱ्या यादीतील उमेदवार :
हिंगोली : बी. बी. चव्हाण,
लातूर : नरसिंहराव उदगीरकर, सोलापूर : राहुल गायकवाड,
माढा : रमेश नागनाथ बारसकर, सातारा : मारूती जानकर,
धुळे : अब्दुल रहेमान,
हातकणंगले : दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटील,
रावेर : संजय पंडित ब्राम्हणे,
जालना : प्रभाकर देवमन बकले,
मुंबई उत्तर-मध्य : अबुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग : काका जोशी.
वंचित सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, त्या बदल्यात काँग्रेसला अकोल्यासाठी समर्थन मागणार नाही. एमआयएमसोबत न जाण्याचा पक्षाचा निर्णय होता. तो मी त्यांना कळविला आहे.
- ॲड. प्रकाश आंबेडकर