‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 10:09 AM2024-05-08T10:09:35+5:302024-05-08T10:22:21+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मिळत असलेलं आव्हान मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दरम्यान, या प्रचार सभांवरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि यांना टोला लगावला आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे हे आव्हान मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दरम्यान, या प्रचार सभांवरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि यांना टोला लगावला आहे. नरेंद्र मोदी तुम्हाला वाटत असेल की भरपूर सभा घेतल्या म्हणजे महाराष्ट्र पुन्हा एकदा फसेल, पण असं नाही आहे, १३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायेत, तर ४ जूनला भारतातील जनता मोदी सरकारचं विसर्जन करेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
एका प्रचारसभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी तुम्हाला वाटत असेल की भरपूर सभा घेतल्या म्हणजे महाराष्ट्र पुन्हा एकदा फसेल, पण असं नाही आहे. महाराष्ट्र भोळा आहे, महाराष्ट्र भाबडा आहे. पण महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. मी छोट्या व्यापाऱ्यांना देखील सांगतो की, तुम्ही आला असाल गुजरातमधून पण वर्षांनुवर्षे तुम्ही महाराष्ट्रात राहताय. मोदी तसे वागले म्हणून उद्धव ठाकरे तसा नाही वागणार. आपण ज्याल्या द्यायचं तेवढं दिलं. मात्र आता विसरून जा. हे माझं वैभव भरलेलं आहे. निवडणूक मे महिन्याच्या तेरा तारखेला आहे. त्या तारखेला भाजपाचे तीन तेरा वाजवायचे आहेत, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं.
ते पुढे म्हणाले की, येत्या ४ जून रोजी संपूर्ण भारत विजयोत्सव साजरा करणार आहे. मोदी सरकारचं विसर्जन करणार आहे. त्यांना मला सोपानदेव यांची कविता ऐकवायची आहे. तिला वात्रटिका म्हणा किंवा काही म्हणा. येड्याच्या पार्श्वभागावर उगवळा बाभूळ, म्हणतो कसा सावलीला बरं आहे. पण अरे वेड्या त्याची मुळं कुठं गेलीत ती कळतंय का तुला, तसं हे बाभळीचं झाड यांच्या पार्श्वभागावरती उगवलं आहे. सावलीला बरं आहे म्हणताहेत, पण मुळ किती खोलवर गेली आहेत, हेच यांना कळत नाही आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
यावेळी लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. त्यातील पहिल्या तीन टप्प्यांमध्ये २४ जागांवर मतदान झालं आहे. तर उर्वरित २४ जागांसाठी १३ आणि २० मे रोजी मतदान होणार आहे.