Maharashtra Lok Sabha Election Result 2024: भाजपने ‘गड’ गमावला; काॅंग्रेसचे दिमाखात झाले कमबॅक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 12:17 PM2024-06-05T12:17:15+5:302024-06-05T12:17:45+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१४ मध्ये दहा, २०१९ मध्ये ९ जागा जिंकून विदर्भाला भाजपने आपला गड केला. मात्र, यावेळी काॅंग्रेसने दिमाखात कमबॅक करतांना महाविकास आघाडीच्या मदतीने शिंदेसेनेलाही एका जागेवर राेखत आपला झेंडा फडकविला..

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: BJP lost its 'fortress'; Congress made a comeback in Dimakh! | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: भाजपने ‘गड’ गमावला; काॅंग्रेसचे दिमाखात झाले कमबॅक!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: भाजपने ‘गड’ गमावला; काॅंग्रेसचे दिमाखात झाले कमबॅक!

- राजेश शेगाेकार
(वृत्त संपादक, नागपूर)

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हाेमपीच तसेच गेल्या दाेन निवडणुकीत भाजपने मिळविलेला एक हाती विजय अशी पृष्ठभूमी असतानाही विदर्भात भाजपला आपला गड शाबूत ठेवता आला नाही. काॅंग्रेसने जाेरदार मुसंडी मारत रामटेक, गडचिराेली, चंद्रपूर, अमरावती, भंडारा गाेंदिया या पाच तर उद्धवसेनेने यवतमाळ अन् शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने वर्धा मतदारसंघात विजय मिळवला. नागपुरातून नितिन गडकरी, अकोल्यातून अनुप धाेत्रे हे भाजपचे उमेदवार निवडून आले. बुलढाण्यात शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत. 

शेतकरी आत्महत्या, कापूस, सोयाबीन, धान या सारख्या शेतमालाचे पडलेले भाव, महागाई, बेरोजगारीबाबत असलेला असंतोष व संविधान धोक्यात या भावनांना काॅंग्रेसने हात घातला. तो मतदारांना भावल्याचे निकालावरुन स्पष्ट दिसत आहे.  नागपुरात भाजपचे हेवीवेट नेते नितिन गडकरी यांना मताधिक्य मिळविण्यासाठी काॅंग्रेसच्या विकास ठाकरे यांनी चांगलेच झुंजविले, रामटेकमध्ये काॅंग्रेसचे आमदार राजु पारवे यांना शिंदेसेनेत प्रवेश देत उमेदवारी देण्याची भाजपने खेळी केली. दुसरीकडे  काॅंग्रेसच्या घाेषीत उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र अवैध झाल्याने ऐनवेळी काॅंग्रसने त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी द्यावी लागली. अशा गाेंधळातही माेदींची सभा, मुख्यमंत्री  शिंदे यांनी मतदारसंघात ठाेकलेला तळही मतदारांना प्रभावित करू शकला नाही, हेच काॅंग्रेसला मिळालेल्या यशावरून दिसत आहे.  

 गडचिराेलीमध्ये भाजप खासदार अशाेक नेते यांची हॅटट्रिक काॅंग्रेसचे डाॅ. नामदेव किरसान यांनी राेखली. विराेधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली हाेती. वर्धा मतदारसंघात काॅंग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना एनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश देत शरद पवारांनी उमेदवारी दिली. काळे यांनी भाजपचे खा. रामदास तडस यांना पराभूत करत विदर्भात राष्ट्रवादीचे खाते उघडले. भंडारा गाेंदियात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती. भाजप खासदार डाॅ. सुनील मेंढे यांच्या विराेधात डाॅ. प्रशांत पडाेळे अशी चुरशीची लढत होऊन पडाेळे यांनी विजयश्री खेचून घेतली. येथे राहूल गांधीची सभा झाली हाेती, हे विशेष.
 विदर्भात वंचित बहुजन आघाडीचा असलेला प्रभाव या वेळी निर्णायक ठरला नसल्याचे उमेदवारांना मिळालेल्या मतांवरुन स्पष्ट होते.

बुलढाण्यात शिंदेसेनाच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ, रामटेकच्या खासदारांना नाकारलेली उमेदवारी महागात पडली, केवळ बुलढाण्यात  प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवित शिंदे सेनेचा झेंडा कायम ठेवला त्यांनी उद्धवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांना मात दिली.

जातीय समीकरण काॅंग्रेसच्या पथ्यावर
चंद्रपुरात काॅंग्रेसच्या प्रतिभा धानाेरकर यांनी भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दाेन लाखांवर मतांनी पराभूत केले. येथे तिसरा प्रभावी उमेदवार नसणे व जातीय समीकरण काॅंग्रेसच्या पथ्यावर पडले अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा यांना स्थानिक भाजप नेत्यांचा विराेध, मित्रपक्ष प्रहारनेही विराेधात दिलेला उमेदवार भाेवला. येथे एकसंघ काॅंग्रेस बळवंत वानखडेंच्या विजयात महत्त्वाची ठरली. यवतमाळमध्ये राजश्री पाटील यांना ऐनवेळी मिळालेली उमेदवारी, उद्धवसेनेचे संजय देशमुख यांच्या फायद्याची ठरली.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024: BJP lost its 'fortress'; Congress made a comeback in Dimakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.