राज्यातील ११ खासदारांची हॅट्ट्रिक रोखली; १० जणांना दुसऱ्यांदा संधी नाकारली
By पोपट केशव पवार | Published: June 8, 2024 07:30 AM2024-06-08T07:30:20+5:302024-06-08T07:30:36+5:30
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राज्यातील दहा खासदारांना मतदारांनी एकदाच संधी दिली. दुसऱ्या वेळी ते निवडणुकीच्या रिंगणात उभे राहताच त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगले यश मिळवताना अनेक नव्या चेहऱ्यांना संसदेत पाठवले असले तरी या नव्या चेहऱ्यांनीच अनेकांची विजयाची हॅटट्रिक रोखली आहे.
महायुती व महाविकास आघाडीमध्ये चुरशीचा सामना झाल्याने राज्यातील तब्बल ११ खासदारांना विजयाची हॅटट्रिक करता आलेली नाही, तर दुसरीकडे तब्बल १० खासदारांना जनतेनेच दुसऱ्यांदा संधी नाकारली. या अटीतटीच्या लढतींमध्येही पाच खासदारांनी सलग तीन वेळा जिंकण्याची किमया साधली.
सन २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळवलेल्या १६ खासदारांनी तिसऱ्या वेळीही विजयासाठी कंबर कसली होती. यात केवळ पाच जणांनाच यश मिळाले. उर्वरित ११ जणांच्या स्वप्नांवर मतदारांनी पाणी फिरविले. यात भाजपचे सहा जण आहेत.
संधी एकदाच, दुसऱ्यांदा केला पराभव
राज्यातील दहा खासदारांना मतदारांनी एकदाच संधी दिली. दुसऱ्या वेळी ते निवडणुकीच्या रिंगणात उभे राहताच त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यामध्ये रणजितसिंह नाईक-निंबाळकर, संजय मंडलिक, नवनीत राणा, सुनील मेंढे, सुजय विखे-पाटील, सुधाकर श्रुंगारे, प्रतापराव पाटील-चिखलीकर, इम्तियाज जलील व डॉ. भारती पवार यांचा समावेश आहे.
यांची हॅट्ट्रिक हुकली
डॉ. हीना गावित (भाजप, नंदुरबार), संजय पाटील (भाजप, सांगली), कपिल पाटील (भाजप, भिवंडी), राजन विचारे (उद्धवसेना, ठाणे), सुभाष भामरे (भाजप, धुळे), सदाशिव लोखंडे (शिंदेसेना, शिर्डी), विनायक राऊत (उद्धवसेना, रत्नागिरी-सिंधुदुर्ग), राहुल शेवाळे (शिंदेसेना, मुंबई दक्षिण), रामदास तडस (भाजप, वर्धा), हेमंत गोडसे (शिंदेसेना, नाशिक), अशोक नेते (भाजप, गडचिरोली-चिमूर).
यांनी केली हॅट्ट्रिक
अरविंद सावंत (उद्धवसेना, मुंबई दक्षिण)
श्रीरंग बारणे (शिंदेसेना, मावळ)
श्रीकांत शिंदे (शिंदेसेना, कल्याण)
रक्षा खडसे (भाजप, रावेर)
संजय जाधव (उद्धवसेना, परभणी).