Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "मी पुन्हा येईन... लोकांची घरं, पक्ष फोडून येईन असं गळा फोडून सांगणारे आता..."; राऊतांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 09:39 AM2024-06-06T09:39:02+5:302024-06-06T09:49:37+5:30
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut And Devendra Fadnavis : संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपाची महाराष्ट्रात झालेल्या पिछाडीची मी जबाबदारी स्वीकारतो. आपण स्वत: कुठेतरी कमी पडलो. ती कमतरता भरून काढण्यासाठी व विधानसभेकरिता पूर्णवेळ काम करायचे असून, मला सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शविली आहे.
फडणवीस यांनी असा कोणताही निर्णय घेऊ नये, यासाठी भाजप नेत्यांकडून त्यांना गळ घालती जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. "महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे.
मी पुन्हा येईन…पुन्हा येईन..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 6, 2024
लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन
असे गळा फ़ोडूनसांगणारे
आता:
मला जाऊदे ना घरी
वाजले की बारा
अशी रेकॉर्ड लावत आहेत.
छान
महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणारनाही.
अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत
जय महाराष्ट्र! https://t.co/RY0bm96tHQ
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मी पुन्हा येईन… पुन्हा येईन.. लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन असे गळा फ़ोडून सांगणारे आता : मला जाऊदे ना घरी, वाजले की बारा, अशी रेकॉर्ड लावत आहेत. छान... महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत. जय महाराष्ट्र!" असं राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात पराभवावर चर्चा करण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, "विधानसभा निवडणुकीसाठी पक्षामध्ये पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी, ज्यामुळे राहिलेल्या कमतरता पूर्ण करण्यासाठी मला वेळ देता येईल. बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही करायचे आहे, ती आमची टीम करेल. त्यांच्यासोबत मी असणार आहे. यासंबंधी पक्षातील वरिष्ठांशी मी भेटणार आहे."
संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या प्रचाराचा जनमानसावर मोठा परिणाम झाला. मराठा आरक्षणाबाबतच्या मुद्द्याचा आम्हाला फटका बसला. कांदाप्रश्नाचाही प्रचार झाला. आम्ही मराठा आरक्षण दिल्यानंतरही त्याबाबत विरोधकांच्या प्रचाराला आम्ही उत्तर देऊ शकलो नसल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.