महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: डॉ. अमोल कोल्हेंसह राज्यातील 5 डॉक्टर उमेदवार आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 13:38 IST2019-05-23T13:36:01+5:302019-05-23T13:38:03+5:30
राज्यातील 5 डॉक्टर उमेदवार संसदेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: डॉ. अमोल कोल्हेंसह राज्यातील 5 डॉक्टर उमेदवार आघाडीवर
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असून बहुतांश निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युतीने बाजी मारली असून आत्तापर्यंतच्या निकालात 42 हून अधिक जागांवर युती आघाडीवर आहे. या आघाडीच्या उमेदवारांपैकी डॉक्टर असणारे उमेदवार नेते बनून संसदेत प्रवेश करणार आहेत.
डॉ. सुजय विखे पाटील
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात मुख्य लढत होती. या लढाईत सध्या डॉ. सुजय विखे पाटील आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
डॉ अमोल कोल्हे
शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे कडवी झुंज देत आहेत. अनेक टर्म खासदार असणारे शिवाजीराव आढळराव यांच्याविरुद्ध अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.
डॉ. प्रीतम मुंडे
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून डॉ. प्रीतम मुंडे यांना पुन्हा पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र याठिकाणी पुन्हा एकदा बीडची जनता मुंडे कुटुंबीयांच्या मागे उभी राहिल्याचं पाहायला मिळालं.
डॉ. हिना गावित
नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून विद्यमान खासदार डॉ. हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे के.सी.पाडवी निवडणूक लढवत आहेत. मात्र या मतदारसंघाने पुन्हा एकदा डॉ. हिना गावित यांना संधी देत असल्याचं चित्र दिसतंय.
डॉ. सुभाष भामरे
धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघातून काँग्रेसकडून कुणाल पाटील निवडणूक लढवत होते. या मतदारसंघातही सुभाष भामरे यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.