महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेला रामराम केलेल्या 'या' नेत्यांना मिळाली खासदारकीची संधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 08:19 PM2019-05-23T20:19:55+5:302019-05-23T20:20:28+5:30

शिवसेनेच्या अनेक दिग्गज उमेदवारांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं.

Maharashtra Lok Sabha election results 2019: Opportunity for MP who left Shiv Sena | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेला रामराम केलेल्या 'या' नेत्यांना मिळाली खासदारकीची संधी 

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेला रामराम केलेल्या 'या' नेत्यांना मिळाली खासदारकीची संधी 

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झालेला आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युतीला बहुमत मिळालं आहे. भाजपाला 23 तर शिवसेनेला 18 अशा जागा मिळाल्या आहेत. जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी नाकारुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास टाकून मतदान केले. शिवसेनेच्या अनेक दिग्गज उमेदवारांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. अनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

शिरुर लोकसभा मतदारसंघातून गेली चार टर्म खासदार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे निवडून आलेले आहेत. डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेचे उपनेते होते. त्यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितली होती मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आली. त्यामुळे शिवसेनेवर नाराज होऊन डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधले. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने शिरुर लोकसभेतून तिकीट दिलं. लोकप्रियता आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बळावर अमोल कोल्हे यांनी शिरुरचा गड काबीज केला. 

सुरेश धानोरकर हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार होते. लोकसभा निवडणुकीत उभं राहण्याचा चंग बांधलेले सुरेश धानोरकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. शिवसेना-भाजपा युतीच्या जागावाटपात ही जागा भाजपाच्या वाट्यात आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर उभे होते. मात्र सुरेश धानोरकर यांनी हंसराज आहिर यांना कडवी झुंज देत हा मतदारसंघ ताब्यात घेत काँग्रेसची लाज राखली. राज्यातून काँग्रेसचे एकमेव जागा निवडून आली ती जागा चंद्रपूरची आहे. 

मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. शिवसेना-भाजपा युती झाल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली. नांदेडमध्ये काँग्रेसच्या तिकीटावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक लढवत होते. प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना पराभूत करत जायंट किलर म्हणून समोर आले. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव राज्यातील धक्कादायक निकालांपैकी एक आहे.    
 

Web Title: Maharashtra Lok Sabha election results 2019: Opportunity for MP who left Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.