महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपासारखं धाडसं शिवसेनेनं दाखवलं असतं तर चित्र वेगळं असतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 11:18 AM2019-05-24T11:18:35+5:302019-05-24T11:20:13+5:30
शिवसेनेचे हे दिग्गज उमेदवार गेले अनेक वर्ष आपले गड सांभाळून होते. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपासोबत एकत्र येत युती केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत हे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेला होता.
मुंबई - गुरुवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर देशातील जनतेने पुन्हा एकदा मोदी सरकारला संधी दिल्याचं पाहायला मिळालं. राज्यातही शिवसेना-भाजपा युतीला अभूतपूर्व यश मिळालं. मात्र शिवसेनेतील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. चंद्रकांत खैरे, अनंत गीते, शिवाजी आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ अशा दिग्गजांना मोदीलाटेतही पराभूत व्हावं लागलं.
शिवसेनेचे हे दिग्गज उमेदवार गेले अनेक वर्ष आपले गड सांभाळून होते. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपासोबत एकत्र येत युती केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत हे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात चित्र पालटलं. शिवसेनेने निवडणुकीच्या निकालात आपल्या जागा राखल्या. मागील लोकसभा निकालात शिवसेनेचे 18 खासदार जिंकले होते यंदाच्या निकालातही शिवसेनेचे 18 खासदार विजयी झाले. मात्र ज्या नेत्यांबद्दल शिवसेनेला विश्वास होतो त्याच प्रस्थापित नेत्यांना जनतेने नाकारलं. या पराभवाचं चिंतन शिवसेनेला नक्की करावं लागणार आहे.
शिवसेनेच्या यशानं उद्धव ठाकरे ठरले राजकारणातील 'चाणक्य' #LokSabhaElectionresults2019https://t.co/nfyuLf76SQ
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2019
अमरावतीत आनंदराव अडसूळ, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव, रायगड अनंत गीते, औरंगाबाद चंद्रकांत खैरे गेली अनेक वर्ष मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. यंदाच्या निवडणुकीत ज्याप्रकारे भाजपाने आपल्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याचं धाडस दाखवलं तसं शिवसेनेने केलं असतं तर बहुदा राज्यातील निकालात शिवसेनेच्या खासदारांचे आकडे वाढले असते असचं म्हणावं लागेल. भाजपाने राज्यात सोलापूरचे शरद बनसोडे, लातूरचे सुनील गायकवाड, अहमदनगरचे दिलीप गांधी, पुण्याचे अनिल शिरोळे, ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, दिंडोरी हरिशचंद्र चव्हाण, जळगावचे ए.टी नाना पाटील या विद्यमान खासदारांचा पत्ता कापला आणि या जागांवर नवीन उमेदवारांना संधी दिली. याठिकाणी भाजपाने पुन्हा विजय मिळविला असून शिवसेनेला हे जमलं नाही.
शिवसेनेला रामराम केलेल्या 'या' नेत्यांना मिळाली खासदारकीची संधी @ShivSena#LokSabhaElectionresults2019https://t.co/MTa15fivpa
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2019
शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगडमध्ये अनंत गीते, अमरावतीत आनंदराव अडसूळ, औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात जनमानसात तसेच पक्षांतर्गत नाराजी होती. शिरुर लोकसभेचं तिकीट द्यावं यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली. मात्र तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. अखेर शिरुर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रस्थापित शिवाजी आढळराव पाटील यांना धक्का देत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावला. निकालांवरुन स्पष्ट होतं की, शिवसेनेच्या प्रस्थापितांना जनतेने नाकारलं. त्यामुळे निवडणुकीपूर्वी जर उमेदवार बदलण्यावर शिवसेनेकडून चिंतन झालं असतं तर शिवसेनेच्या खासदारांची संख्या वाढलेली पाहायला मिळाली असती.