महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उद्धव यांनी पुन्हा सिद्ध केले नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 05:19 AM2019-05-24T05:19:50+5:302019-05-24T05:20:34+5:30
पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहासह केंद्र व राज्य सरकारवर वारेमाप टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य वेळी युतीच्या गाडीत जाऊन बसले.
- यदु जोशी
पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहासह केंद्र व राज्य सरकारवर वारेमाप टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य वेळी युतीच्या गाडीत जाऊन बसले. पाच वर्षांत सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोन्हीही भूमिकेत शिवसेना राहिली आणि त्यांनी विरोधी पक्षांची ‘स्पेस’देखील भरून काढली. मात्र निवडणूक लागताच काळाची गरज ओळखून भूमिका बदलली. उद्धव यांनी ऐनवेळी भूमिका बदलली तरी शिवसैनिक त्यांच्यासोबत राहिले. राज ठाकरेंनी भूमिका बदलून ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला गेले पण मनसैनिक त्यांच्यासोबत गेले नाहीत. हा दोन भावांमधील फरक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडून लाभलेला राजकीय वारसा टिकवून ठेवणे किंबहुना तो अधिक समृद्ध करणे हे उद्धव यांच्या पुढचे आव्हन होते. मात्र उद्धव यांनी मोदी-शहा-फडणवीसांच्या प्रभावातही शिवसेना टिकवली. शिवसेना फुटणार, शिवसेनेत असंतोष आहे, अशा बातम्या येत असतानाही अत्यंत धिरोदत्तपणे उद्धव यांनी संघटना बांधून ठेवली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे नेते त्यांच्यावर तुटून पडलेले असताना त्यांनी महापालिकेवर भगवा फडकावला. लोकसभा निवडणुकीत युती करताना त्यांनी भाजप नेतृत्वास आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडले. देशात मोदींंची लाट असल्याचे अचूक ओळखत भाजपशी युती करण्याचे मुत्सद्दीपण उद्धव ठाकरे यांनी दाखविले. त्यासाठी यूटर्न घेतला.
>भाकरी परतवली नाही
अनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी बदलली असती तर चित्र वेगळे असते. योग्य वेळी भाकरी परतवली नाही. शिवसेनेचे काही जण मोदीलाटेने तरले.
भाजपसोबत किती ताणायचे आणि कुठे थांबायचे याचे अचूक भान उद्धव ठाकरे यांनी दाखवत युती केली. २०१४ प्रमाणे याहीवेळी मोदी लाटेचा शिवसेनेला मोठा फायदा झाला.
शिवसेना हा भाग्यवान पक्ष आहे. गळ्यात भगवा दुपट्टा टाकून भगवा टिळा लावला अन् जय भवानी-जय शिवाजी म्हटलं की शिवसैनिक चार्जड् होतो. पक्षासाठी पदरचे पैसे खर्च करणाऱ्या शिवसैनिकांचाही हा विजय आहे.