Maharashtra Lok Sabha election results 2024: उमेदवार निवडीचा गाेंधळ, समन्वयाच्या अभावामुळे महायुतीचा टक्का घसरला
By विलास बारी | Published: June 5, 2024 12:12 PM2024-06-05T12:12:57+5:302024-06-05T12:13:50+5:30
Maharashtra Lok Sabha election results 2024: उत्तर महाराष्ट्र हा शिवसेना-भाजप महायुतीचा बालेकिल्ला मानला जात असताना या निवडणुकीवेळी महायुतीतील गोंधळाचा आणि परस्परांमध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव यामुळे महाविकास आघाडीने लाभ उठविला.
- विलास बारी
वरिष्ठ उपसंपादक, जळगाव
जळगाव : कांदा निर्यादबंदी निर्णय, शेतमालाचा हमी भाव, महायुतीतील उमेदवार निवडीचा गोंधळ तसेच मराठा, दलित व मुस्लिम मतदारांची नाराजी यामुळे उत्तर महाराष्ट्रात महायुतीला जोरदार फटका बसला यावेळी महायुतीला केवळ दोन जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीने चार जागांवर विजय मिळवित जोरदार मुसंडी मारली आहे. जळगाव व रावेर मतदार संघात भाजपने विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. याठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडीबाबतच्या गोंधळाचा फटका बसला. तसेच उद्धवसेना व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडील कार्यकर्त्यांची फळी व नेतृत्वाचा अभाव जाणवला.
नंदुरबारमध्ये हिना गावित यांच्याबाबत महायुतीच्या नेत्यांची नाराजी तसेच घराणेशाहीचा फटका बसला. काॅंग्रेस उमेदवार गाेवाल पाडवी हे नवखे असल्याने सहज पराभव करता येईल हा अतिआत्मविश्वास घातक ठरला. धुळ्यात काॅंग्रेसच्या शोभा बच्छाव आणि भाजपचे उमेदवार डाॅ.सुभाष भामरे यांच्यात लढत झाली. डाॅ.भामरे यांना मालेगाव मध्य व बागलानमध्ये मतदारांच्या नाराजीचा फटका बसला. अटीतटीच्या या लढतीत काॅंग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला.
महायुतीतील गोंधळाचा फायदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्करराव भगरे यांना मिळाला. याठिकाणी केंद्रीय मंत्री डाॅ.भारती पवार यांचा पराभव झाला. नाशिकमध्ये शिंदेसेनेचे हेमंत गोडसे यांना दलित, मुस्लिम व ओबीसी मतदारांच्या नाराजीचा फटका बसला. १० वर्ष खासदार असताना अपेक्षित कामे न झाल्यामुळे मतदारांची नाराजी होतीच. याठिकाणी उद्धवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे विजयी झाले.