Maharashtra Lok Sabha election results 2024: दलित-मुस्लिम मतांचा ‘मविआ’ला फायदा; जरांगे फॅक्टर, सरकारविरोधी सुप्त लाटेचा महायुतीला बसला दणका
By नंदकिशोर पाटील | Published: June 5, 2024 12:04 PM2024-06-05T12:04:28+5:302024-06-05T12:05:30+5:30
Maharashtra Lok Sabha election results 2024 : मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता उर्वरित सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
- नंदकिशोर पाटील
(संपादक, छत्रपती संभाजीनगर)
छत्रपती संभाजीनगर : मागील लोकसभा निवडणुकीत मतविभागणीला कारणीभूत ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीला बाजूला सारत बहुसंख्य दलित-मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा, शेतकरी-बेरोजगारांमध्ये असलेला असंतोष, फोडाफोडीच्या राजकारणामुळे सरकारविरोधात तयार झालेले जनमत आणि मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलन अशा अनेक घटकांचा जबर फटका महायुतीला बसला. परिणामी, मराठवाड्यात महायुतीची सात जागांवरून एका जागेवर घसरण झाली.
मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता उर्वरित सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. मराठवाड्यात भाजपला चार जागांचा फटका बसला तर काँग़्रेसला तीन जागांचा फायदा झाला. एमआयएमची एक जागाही गेली. शिवसेनेची फाटाफूट आणि धनुष्यबाण नसल्याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसू शकतो, असे अनुमान निवडणूकपूर्व काढण्यात येत होते. मात्र मतदारांनी या शक्यतेला छेद दिला. औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली अशा चार जागा उद्धवसेनेने लढविल्या. पैकी औरंगाबाद वगळता इतर तिन्ही जागा ठाकरे यांना मिळाल्या आहेत. औरंगाबादेत चंद्रकांत खैरे पराभूत झाले. खैरे हे एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा पराभव करू शकणार नाहीत, या चर्चेमुळे अखेरच्या टप्प्यात बहुसंख्य हिंदू मतदार महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्याकडे वळले असण्याची शक्यता आहे.
नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात घेतल्याचा फायदा भाजपला झाला नाही. उलट या फोडाफोडीचा फटकाच बसला. लातूरमध्ये डॉ. शिवाजीराव काळगे यांचा विजय काँग्रेसचे मनोबल उंचावणारा आहे. मराठा, लिंगायत, ओबीसी, मुस्लिम आणि काही प्रमाणात दलित मतांमुळे डॉ. काळगे विजयी झाले. जालन्यात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी पराभव केल्याने दानवे यांचा षटकार हुकला. दानवेंना जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला. मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी सुमारे सव्वा लाख मते घेऊनदेखील दानवेंना फायदा झाला नाही.
बीडमध्येदेखील भाजपच्या पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलनाचा फटका बसला. बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या वादात राष्ट्रवादीचे (शरद पवार) बजरंग सोनवणे यांचे पारडे जड राहिले! अगदी शेवटच्या ३२ व्या फेरीपर्यंत निकालात उलटफेर होत होता. शेवटच्या फेरीत सोनवणे विजयी झाले. परभणीतही मराठा-ओबीसी असा वाद झाला. मात्र तिथे मराठा मतांशिवाय दलित आणि मुस्लिम मतांची साथ मिळाल्याने उद्धव सेनेचे संजय उर्फ बंडू जाधव यांची हॅटट्रिक झाली.
विधानसभा निवडणुकीवर परिणामाची शक्यता
मराठवाड्यात काँग्रेस (३), उद्धवसेना (३), भाजप आणि शिंदेसेना प्रत्येकी एक जागा मिळाली तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. मराठवाड्यात विधानसभेच्या ४६ जागा आहेत. या निकालाचा परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो.
मराठवाडा :
२०२४
भाजप : ०
उध्दवसेना : ३
काँग्रेस : ३
शिंदेसेना : १
राष्ट्रवादी शरद पवार गट : १
२०१९ :
भाजप : ४
शिवसेना : ३
एमआयएम : १