"फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं": पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 04:41 PM2024-06-05T16:41:59+5:302024-06-05T16:52:04+5:30
देवेंद्र फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
Prithviraj Chavan on Devendra Fadnvais : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या मोठ्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केंद्रीय नेतृ्त्वाकडे केली आहे. २८ जागांवर निवडणूक लढणाऱ्या भाजपला केवळ नऊ जागांवर यश मिळवलं. पत्रकार परिषदेत आम्ही कमी पडलो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.तसेच पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपच्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. यावर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली ते योग्यच केलं असं म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली नेतृत्वाची दिशाभूल केल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
"महाराष्ट्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला त्याची कोणीतरी जबाबदारी घेणे आवश्यक होते. ती देवेंद्र फडणवीसांनी घेतली. कारण दिल्लीच्या नेतृत्वासमोर त्यांनी ४५ पेक्षा अधिक जागा मिळवणार असल्याचे चित्र निर्माण केले होते. देवेंद्र फडणवीसांनी जो आकडा दिला तो गृहीत धरुन मोदींनी ४०० पारची घोषणा केली. त्यानंतर मोदी तोंडघशी पडली. कोणीतरी त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. विधानसभेसाठी हा प्रयत्न आहे. पण त्यांचा राजीनामा स्विकारला जातो की नाही हे पाहावं लागेल. सकृतदर्शनी देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या नेतृत्वाची दिशाभूल केली त्याची जबाबदारी त्यांना स्विकारावी लागेल. त्यामुळे भाजपचा ग्राउंड रिॲलिटी टच संपलेला आहे. त्यांनी पक्ष फोडाफोडीचे राजकारण केलं आणि त्याला मोदींचा थेट आशीर्वाद मिळवला. काहीतरी चुकल्याची त्यांना जाणीव झाली हे बरं झालं," असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यासोबत मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.