राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या महायुतीच्या उमेदवारांचे काय झालं? पाहा कोण आघाडीवर?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 01:57 PM2024-06-04T13:57:38+5:302024-06-04T13:57:53+5:30
Maharashtra Lok Sabha Election : मनसेनेच्या राज ठाकरे यांनी काही प्रचारसभा घेत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता.
Raj Thackeray Lok Sabha Election : लोकसभेसाठी देशभरात सात टप्प्यात झालेल्या निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. २०१९मध्ये देशभरात अनेक राज्यात क्लिन स्विप मिळवणाऱ्या भाजपला यंदाची निवडणूक अवघड जाताना दिसतेय. दुसरीकडे इंडिया आघाडीला मोठे यश मिळत असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या बाजूने कल जाताना दिसतोय. तर दुसरीकडे भाजपला काही प्रमाणात अपयश मिळताना दिसत आहे. या निवडणुकीदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देखील दिला होता. मात्र आता राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवारांचा नक्की काय झालं याची सगळीकडे उत्सुकता पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी सभा घेत महायुतीला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या प्रचारात कधी उतरणार अशी उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी तीन प्रचारसभा घेतल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि पुणे लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे, ठाण्यात नरेश मस्के, कल्याण-डोंबिवलीसाठी श्रीकांत शिंदे आणि पुण्यातून मुरलीधर मोहळ या उमेदवारांसाठी राज ठाकरे मैदानात उतरले होते. आता या लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांची मुख्य लढत होती. या मतदारसंघात आता नारायण राणे हे आघाडीवर असून त्यांना आपर्यंत २,७३, ६८७ मते मिळाली आहे. नारायण राणे यांनी जवळपास ३८ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त विनायक राऊत यांना २,३५, ६६१ मते मिळाली आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात मुख्य लढत होती. या लढतीत श्रीकांत शिंदे यांनी लाखभर मतांची आघाडी घेतली आहे. श्रीकांत शिंदे यांना जवळपास तीन लाख मते मिळाली आहेत. तर वैशाली दरेकर यांना १, ६१,०९४ मते मिळाली आहेत.
पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत झाली. भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी आतापर्यंत जवळपास २,३९,४३१ मते मिळवली आहेत. तर रवींद्र धंगेकर यांनी १,९८,५३१ मते मिळवली आहेत.