महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सर्वाधिक बालगुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 12:39 AM2017-03-24T00:39:59+5:302017-03-24T00:39:59+5:30
देशात दरवर्षी बालगुन्ह्यांची सरासरी ३५ हजार प्रकरणे समोर येतात. यातील एक तृतीयांशहून अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील असतात
नितीन अग्रवाल / नवी दिल्ली
देशात दरवर्षी बालगुन्ह्यांची सरासरी ३५ हजार प्रकरणे समोर येतात. यातील एक तृतीयांशहून अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील असतात, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर यांनी बुधवारी लोकसभेत दिली.
किशोरवयीन मुलांकडून गुन्हे होण्याचे सर्वाधिक प्रकार महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात घडत आहेत. भाजपचे कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना अहिर यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या तीन वर्षांत देशभरात एकूण १,३३,१२१ किशोरवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. यात महाराष्ट्रातील २२,६१० आणि मध्यप्रदेशातील २३,०३७ मुलांचा समावेश होता. २०१३ च्या तुलनेत २०१४ आणि २०१५ मध्ये दोन्ही राज्यांत बालगुन्ह्यांच्या प्रमाणात थोडी घट झाली आहे. यादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांच्या संख्येत मध्यप्रदेशमध्ये वाढ, तर महाराष्ट्रात घट झाली. मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीमागील कारणांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अहिर म्हणाले की, सरकारने याबाबत कोणताही अभ्यास केलेला नाही. बालसुधारगृहांची स्थिती सुधारण्यासाठी गेल्या वर्षी १५ जानेवारीपासून नवा कायदा आणण्यात आला आहे, असेही हंसराज अहिर म्हणाले.