मानापमान नाट्यानंतर शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; भुजबळ म्हणाले, “नाराज होणे...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:58 IST2024-12-05T18:57:41+5:302024-12-05T18:58:28+5:30
Maharashtra CM Swearing-in Ceremony: प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

मानापमान नाट्यानंतर शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; भुजबळ म्हणाले, “नाराज होणे...”
Maharashtra CM Swearing-in Ceremony: मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एनडीएतील राज्यांचे मुख्यमंत्री, दिग्गज उद्योगपती, अभिनेते-कलाकार, क्रिकेट विश्वातील मंडळी, संत-महंत तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, तत्पूर्वी, दिवसभर नाराजीचे मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले.
राजभवनावर जाऊन महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही, यावर एकनाथ शिंदे यांचे एकमत होते नव्हते. शपथविधी सोहळ्याला काही तास राहिले असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यांची मनधरणी केली. शपथविधी सोहळ्यानंतर अमित शाह यांच्याशी बैठक होण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर अखेर मानापमान नाट्यावर पडदा पडला आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
वास्तविकता काय आहे हे आपल्याला पाहावेच लागते
देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष मुख्यमंत्री होते. भाजपाचे १०५ आमदार असताना एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन आले आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. तेव्हा सगळ्यांना वाटले होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण वेगळेच झाले. शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, बाहेर राहून सरकारला पूर्णपणे पाठिंबा देणार. परत केंद्रातून आदेश आला की, तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हा आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करा. त्यांना थोडे दुःख तरी झालेच असेल. त्यांनी त्या आदेशाचे पालन केले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतले, जीव तोडून मेहनत केली. पदाला न्याय दिला आणि त्यांच्या पक्षाचे १३२-१३३ आमदार निवडून आले. नाराज तर तेपण झाले. त्यांचे नाराज होणे चूक म्हणत नाही. पण वास्तविकता काय आहे हे आपल्याला पाहावेच लागते, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान, हे तीन प्रमुख आहेत. तीन जण एकत्र आले की तिन्ही पक्ष एकत्र आल्याचा संदेश जाईल. प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल. एखाद्याचे मंत्रीपद गेले की तो नाराज होतो, हे स्वाभाविक आहे. जर एखाद्याचे मुख्यमंत्रीपद गेले आणि उपमुख्यमंत्रीपदावर काम करायला सांगितले तर कोण नाराज होणार नाही? हा मानवी स्वभाव आहे, मीही नाराज झालो असतो, असे भुजबळ यांनी म्हटले.