लगीन घाईत 'नवरी'चाच विसर! नवरीला एक्स्प्रेसमध्ये विसरुन व-हाडी मंडपात....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 01:40 PM2018-03-25T13:40:20+5:302018-03-25T13:42:29+5:30
लग्न म्हटलं की लगीन घाई आलीच. मुलीच्या लग्नासाठी नागपूरहुन नाशिककडे निघालेल्या वऱ्हाडाची मात्र भलतीच लगीन घाई झाली.
- मनीषा म्हात्रे
मुंबई - लग्न म्हटलं की लगीन घाई आलीच. मुलीच्या लग्नासाठी नागपूरहुन नाशिककडे निघालेल्या वऱ्हाडाची मात्र भलतीच लगीन घाई झाली. एक्सप्रेसने नागपुरहून नाशिककडे वऱ्हाड नवऱ्या मुलीला घेऊन निघाले. पण, नाशिक येताच इतकी घाई झाली की नवरी मुलगी ट्रेनमध्येच राहिली आणि वऱ्हाडने मंडप गाठले. तेथे गेल्यानंतर नवरीचा शोध सुरु झाला. नाशिक स्थानक आले तेव्हा नवरी टॉयलेटमध्ये गेली होती, पण हे वऱ्हाडाच्या लक्षात न आल्याने ते नाशिकला उतरून आणि नवरी थेट इगतपुरीला पोहचली. डब्यात मुलीला रडताना पाहून इगतपुरी पोलिसांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सूखरूप तिला लग्नमंडपात पोहचविले.
नागपुरच्या गोपाळ पेठ मध्ये मिरगे कुटुंबिय राहतात. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे.रविवारी दुपारी १ वाजता नाशिक रोडयेथे मुलगी रजनीचा विवाह सोहळा होता. सकाळच्या एक्सप्रेसने व-हाड़ नवरीला घेउन नागपुरहून नाशिककड़े यायला निघाले. त्याच दरम्यान सकाळी साडे आठच्या सुमारास एक्सप्रेस नाशिक रोडवर आली. त्यापूर्वीच नवरी बाथरूममध्ये गेली. इथे स्टेशन येताच सामान उतरविण्याच्या नादात ते नवरीला बाथरूममध्येच सोडुन निघाले. व-हाडाने मंडप गाठले. तेथे गेल्यानंतर नवरीच ग़ायब असल्याने सर्वाच्याच भुवया उँचावल्या. मंडपात नवरीचा शोध सुरु झाला. फोनाफोनी सुरु झाली.
हा शोध सुरु असताना इथे बाथरूममधुन बाहेर आलेल्या नवरीच भलतीच तारांबळ उडाली. व-हाडी न दिसल्याने ती घाबरली. अनोळख़ी चेहरे पाहुन तिही रड़ु लागली. अशातच इगतपूरी स्थानक येताच रेल्वे पोलिसांकडून सामानाची झड़ती सुरु झाली. त्याच दरम्यान पोलीस शिपाई गजानन जाधव, अनिता गवई, विकास साळूंखे यांचे लक्ष रजनीकड़े गेले. त्यांनी तिच्याकड़े विचारपूस केली. मात्र घाबरलेली रजनी हंबरडा फोडून फ़क़्त नाशिकला उतरायचे होते असे सांगत होती. जाधव तिला घेउन आरपीएफ कक्षात आले. तेथे तिला विश्वासात घेत चौकशी सुरु केली तेव्हा वरील घटनाक्रम उलगडला. त्यांनी तत्क़ाळ तिने दिलेल्या मोबाईल क़्रमाँकावर संपर्क साधून मुलीची माहिती दिली. मुलगी सूखरूप असल्याचे समजताच नातेवाईकाँनी नवरीकड़े धाव घेतली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती लग्नाच्या अर्ध्या तासापूर्वी मंडपात पोहचली. आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला.