Atul Save | भाजपाची पक्षविस्ताराची खेळी?; "नवीन सहकारी संस्थांना मंजुरी देऊ, पण 'आमच्या' जिल्हाध्यक्षाचं पत्र हवं!"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 12:12 PM2023-02-10T12:12:38+5:302023-02-10T12:14:07+5:30
बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्याला उमेदवारी करता येणार असल्याचीही माहिती सहकार मंत्री अतुल सावेंनी दिली.
Atul Save | महाराष्ट्रात काही वर्षांपासून नव्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे काम बंद ठेवण्यात आले होते. आता मात्र या दिशेने हालचाली सुरू झाल्या असून त्याची नोंदणी पुन्हा सुरू केली जाणार आहे. या नोंदणीबाबत महत्त्वाची बाब अशी आहे की, नव्या संस्थांना मंत्रालयातून नोंदणीची मान्यता मिळणार आहे. यासाठी स्थानिक भाजपच्या जिल्हाध्यक्षांची शिफारस लागणार असल्याची घोषणा सहकार मंत्रीअतुल सावे यांनी गुरुवारी नगरमध्ये पक्षाच्या बैठकीत केली. कोणत्याही सहकारी बँकेचे सभासदत्व पक्षाच्या कार्यकर्त्यांला हवे असेल तर त्यासाठी त्या कार्यकर्त्यांनी मला येऊन भेटा. तुम्ही माझ्याकडे आला तर मी तुम्हाला ती नोंदणी मिळवून देतो, असे सावे म्हणाले. सहकार मंत्रीअतुल सावे नगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ही घोषणा केली. सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार विभाग व इतर मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या योजनांचा आढावाही घेतला.
बाजार समित्यांच्या निवडणुका एप्रिल अखेरीस
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलच्या सुमारास घेतल्या जातील आणि त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी त्यामध्ये सकारात्मक भूमिका नक्कीच घेतली जाईल. बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्याला उमेदवारी करता येईल, त्यासाठी लवकरच तसा आदेशही काढला जाईल, अशी महत्त्वाची माहितीदेखील सहकार मंत्री सावे यांनी दिली.
ज्या सहकारी पतसंस्था, नागरी बँकांच्या सहकार कलम ८३ व ८८ अन्वये चौकशी सुरू आहे, त्यांची त्वरित चौकशी पूर्ण करून कारवाई करा. अशी प्रकरणे आता फार काळ प्रलंबित ठेवू नया, अशी सक्त सूचना सहकार मंत्री सावे यांनी अधिकाऱ्यांना दिली. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या संस्था अवसायनात आहेत त्यांच्या निवडणूक प्रक्रिया येत्या तीन महिन्यात सुरू करावी, असे सावे यांनी स्पष्टपणे सांगितले.