शिवभोजन थाळीचा राज्यातील गोरगरीब, मजूर वर्गाला मोठा आधार : छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 07:11 PM2021-04-16T19:11:45+5:302021-04-16T19:15:47+5:30
Shivbhojan Thali : गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजन थाळीवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी, भुजबळ यांचं वक्तव्य
"दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा काळात मजूर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीबांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत आहे," असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान गुरुवारी पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले. तर शुक्रवारी दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने गुरूवारी मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम व राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण केल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. यावर्षी पुन्हा हे संकट ओढावल्यामुळे विभागाला अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
गरजूंसाठी फायदेशीर
"संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे अशा गरजू कुटुंबासाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजूर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने समाधान वाटत आहे," अशी भावनादेखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
टीका करणाऱ्यांचा समाचार
शिवभोजन थाळीबद्दल माहिती देतानाच या योजनेवर टीका करणाऱ्यांचा समाचार देखील छगन भुजबळ यांनी घेतला. गेले अनेक दिवस समाज माध्यमांवर शिवभोजन थाळीवर टीका केली जात आहे मात्र गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी आणि मग समाज माध्यमात व्यक्त व्हावे असे मतदेखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.