"राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:59 PM2023-04-18T12:59:01+5:302023-04-18T12:59:15+5:30
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं मोठं राजकीय विधान
प्रशांत भदाणे, जळगाव: "राज्याच्या वातावरणात जसं ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे, तसंच ढगाळ वातावरण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपचा जोरदार पाऊस पडणार आहे", असं मोठं राजकीय विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आपल्या काही आमदारांसह महायुतीच्या बाजूने जातील, अशी चर्चा सुरू असतानाच गुलाबराव पाटलांनी हे सुचक विधान केल्यानं खळबळ उडाली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पाळधी येथील निवासस्थानी लोकमतशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटलांनी काही राजकीय आडाखे देखील व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महायुतीच्या बाजूने जातील, अशी जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे दोन ते तीन वेळेस नॉटरिचेबल झाल्याचीही चर्चा होती. याच अनुषंगाने मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, हवामानाचा अंदाज असा दिसतोय की राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडेल असं दिसतंय. अजित पवार आता थांबणार नाहीत, असं मला वाटतं. अजित पवार हे डॅशिंग नेता आहेत. ते नॉटरिचेबल वाला नेता नाहीत. 24 तास काम करणारा माणूस आहे. कोणताही निर्णय घेताना ते घाबरणार नाहीत. सध्या जुळवाजुळव करण्याला थोडा वेळ लागतोय. पण ते जेव्हा होईल तेव्हा शिवसेना भाजपचा पाऊस जोरात पडेल, असं सांगत त्यांनी राजकीय उत्सुकता आणून धरली.
...तर अमर अकबर अँथनी पिक्चर चांगला चालेल!
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजित पवार एकत्र आले तर राज्याच्या विकासाला चालना मिळेल. अजित पवार सोबत आले तर अमर अकबर अँथनी हा पिक्चर चांगला चालेल, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.