ED: "नुसतं बोलावलं तरी मुलगी आत्महत्या करेल"; जितेंद्र आव्हाडांनी बोलून दाखवली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:53 PM2022-03-23T12:53:46+5:302022-03-23T12:55:20+5:30
Jitendra Awhad : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कन्येबाबत मोठं विधान केलं आहे.
Jitendra Awhad : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ फ्लॅट्स (सदनिका) जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतीन अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. यादरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कन्येबाबत मोठं विधान केलं आहे.
"मी काही चुका केलेल्या नाहीत. परंतु वरच्या टेपिंगमध्ये वगैरे काही चुका असतील तर मला कल्पना नाही," असं आव्हाड म्हणाले. न्यूज १८ लोकमतशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "कोणी बोलो न बोलो पण भीती ही माणसाला खात असते हे मी अगदी स्पष्टपणानं बोलतो. रात्री जर तीन वाजता दारावर टकटक जरी झालं तरी हार्टअॅटॅक येण्याच्याच शक्यता असतात. कोण कोणाच्या घरात घुसेल हे ध्यानीमनीही नाही. यात सर्वाधिक हाल हे ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो त्यांचेच होतात," असं आव्हाड म्हणाले.
आज मी ३८ वर्ष राजकारणात आहे. माझ्या मुलीचा राजकारणाशी काही संबंध नाही. पण आज ती किती ठिकाणी डायरेक्टर आहे. तिला जर उद्या नुसतं बोलावलं तरी ती आत्महत्या करेल. त्यांना असल्या सवयी नाही, ते फ्री बर्ड्स आहेत," असं म्हणत त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं.
"देशातलं वातावरण इतकं गढूळ होत चाललंय, मला तरी वाटतं तिनं देशात राहू नये. कोरोनामध्ये मी जेव्हा होतो तेव्हा तिची जी परिस्थिती मी पाहिली, तीच भीतीदायक होती. माझ्याबाबतीत घडणार नाही याची १०० टक्के खात्री आहे. पण उद्या काही झालंच तर माझ्या पोरीचं काय हा माझ्या मनात पहिला विचार येतो," असंही त्यांनी सांगितलं.