“इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही,” आव्हाडांनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 12:46 PM2022-05-14T12:46:03+5:302022-05-14T12:47:13+5:30
अभिनेत्री केतकी चितळे हीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक स्तरांतून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील यावर भाष्य केलं. “अशा गोष्टींमुळे सर्व स्तरांमध्ये चिड निर्माण होते. समजाता वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्यांमध्ये चिड निर्माण होते. जे आमच्या भगिनीनं लिहिलंय ते वाचवतही नाही. त्यांना कदाचित माहित नसेल शरद पवार यांचे तीन ऑपरेशन झाले आहेत. त्यातून ते बाहेर आलेत. अशा परिस्थितीतही ते गावखेड्यात शेतात जातात, सभा घेतात. ते देखील ८३ व्या वर्षी. त्यांच्या पत्नीही वाचत असतील ना या सर्व गोष्टी, मुलगीही पाहत असेल. त्यांना हृदय नाही का, आपलं असं काहीच नाही का?,” असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. अभिनेत्री केतकी चितळे हीच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“ते मनानं खुप मोठे आहेत. तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही. त्यांची लाळ गळतेय, त्यांना नरक मिळालं पाहिजे, ८३ वर्षीय वृद्ध व्यक्तीला तुम्ही असं बोलू शकत नाही. कोणाच्या व्यंगावर आजारावर टीका करायची नाही हे आपल्याला महाराष्ट्र धर्मानंच शिकवलं आहे,” असंही ते म्हणाले.
राऊतांकडूनही टीका
"काही व्यक्ती हिमालयाएवढ्या असतात. काही व्यक्ती सूर्याच्या तेजासारख्या तळपत असतात. सूर्यावर कुणी थुंकलं किवा हिमालयाला कुणी तोंड वेंगाळून दाखवलं तर हिमालय आणि सूर्याचं महत्व काही कमी होत नाही. हे नशेबाज लोक आहेत यांना वेगळ्या प्रकारची नशा कुणीतरी चढवलेली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशात असे क्षुद्र किटक वावरत असतात. खिडकी उघडली आणि हवा आली की ते हवेबरोबर उडून जातील", असं संजय राऊत म्हणत संजय राऊत यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला.
केतकी चितळेवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबाबत आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये केतकीनं शरद पवार यांच्या आजारावरून टीका केली होती.