निजामाच्या विचारांचे लोक आजही निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव : जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 09:16 AM2021-09-27T09:16:45+5:302021-09-27T09:17:22+5:30
मराठवाडा साहित्य संमेलनाचा झाला समारोप.
यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी, औरंगाबाद : मराठवाडा हा प्रदेश लढाऊ आहे. या भागातील लोकांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळविले. अत्याचारी, पाशवी निजामाचा पराभव केला. कासीम रझवीच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांना आज मराठवाड्यातील लोक महानगरपालिकांमध्ये निवडून देतात, हे दुर्दैवी असल्याची टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘एमआयएम’चे नाव न घेता केली.
लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समोराप कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते. मराठवाड्याला एक वर्षे दोन महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारत सरकार मदतीला आले; परंतु मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा कासीम रझवी हा शरण आला, तेव्हा त्यास भारतात राहायचे की पाकिस्तानात, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने पाकिस्तानची निवड केली. निजाम हा अत्याचारी, पाशवी, क्रूर होता. त्याच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा दिला, असे आव्हाड म्हणाले.
मराठवाडा उपेक्षित कसा, मराठवाड्याकडे दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्न उपस्थित करताना शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अमित देशमुख, राजेश टोपे यांच्यासह इतर मंडळी राज्याचे धोरण ठरविण्यामध्ये असताना मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळाले नाही, हे म्हणणे चुकीचे आहे, असे आव्हाड म्हणाले.
स्त्रियांच्या लेखनाचा संबंध चारित्र्याशी जोडला जातो
- स्त्रियांनी काही लेखन केल्यास, त्याचा संबंध चारित्र्याशी जोडण्याची प्रथा आपल्याकडे रुजविण्यात आली आहे. त्यामुळे या व्यवस्थेला उद्ध्वस्त करीत स्त्रीला स्वतंत्रपणे लिहिता येईल, असे वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संमेलनातील परिसंवादात मान्यवरांनी केले.
- मराठवाडा साहित्य संमेलनात प्र.ई. सोनकांबळे व्यासपीठावर आयोजित चौथ्या परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांनी स्त्रीवादावर चर्चा करताना मराठी लेखिका-कवयित्रींच्या लेखनासंबंधीचे अनेक पदर उलगडून दाखविले.