Jitendra Awhad : "पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा...", जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 10:34 AM2022-01-05T10:34:29+5:302022-01-05T10:35:09+5:30
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या घराजवळ राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. तसेच, पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे.
मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घरावर बुधवारी मोर्चा येणार असल्याचे स्वतः ट्विटद्वारे सांगितले आहे. मोर्चा पुण्यावरून येत असल्याचा उल्लेख करत पोलिसांना वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या घराजवळ राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. तसेच, पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या त्यांच्या घरासमोर जमा झाल्या. त्यांनी आव्हाडांच्या बाजूने आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या महिला कार्यकर्त्यांना बाहेरच अडवून घरापासून दूर नेले तर आव्हाडांच्या घरी आधीच 60-70 कार्यकर्ते, नगरसेवक, शहर अध्यक्ष उभे आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी रात्री उशिरा ट्विटद्वारे म्हटले आहे की, "उद्या (बुधवारी) माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा....... जय भीम!"
उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा.......
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 4, 2022
जय भीम!
दरम्यान, ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने नुकतेच ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या त्या भाषणाचे व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
(जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. फोटो- विशाल हळदे)
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
"खरं तर ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचे होते, तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला फक्त महार आणि दलित समाज होता. कारण ओबीसींना लढायचे नव्हते. ओबीसींवर ब्राह्मणवादाचा पगडा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असे त्यांना वाटते. पण त्यांना हे माहित नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येत देत नसते. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येत आहेत. नुसते घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे. केंद्र सरकारशी दोन हात करावे लागणार आहेत", असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.