"आईला ते कधीच आवडायचं नाही"; पाहा कसा झाला आव्हाडांचा राजकारणात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 12:37 PM2021-10-02T12:37:20+5:302021-10-02T12:38:28+5:30
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या मनात राजकारणाची आवड केव्हापासून निर्माण झाली आणि कसा त्यांनी राजकारणात प्रवेश केला याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला. UPSC ची संधी हुकल्याबद्दलही केलं वक्तव्य.
जितेंद्र आव्हाड हा चेहरा आज महाराष्ट्रातीलराजकारणात सर्वांच्याच परिचयाचा आहे. परंतु त्याच्या मनात राजकाणाबाबतची आवड कशी निर्माण झाली आणि त्यांचा हा प्रवास केव्हापासून सुरू झाला, याचा उलगडा खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी लोकमतशी सांधलेल्या संवादादरम्यान केला. लोकमतच्या फेस टू फेस या कार्यक्रमात आव्हाड यांनी लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत साधलेल्या संवादात आपल्या लहानपणापासून ते राजकारणापर्यंतच्या प्रवासाचा उलगडला आहे. आपण कॉलेजपासूनच राजकारणाकडे वळत गेलो आणि त्या गोष्टी आपोआप होत गेल्या असं आव्हाड यावेळी म्हणाले.
"कॉलेजमध्ये असताना माझी ओळख निर्माण होत गेली. त्यावेळी कॉलेजमध्ये ऑल इंडिया स्टुंडेंट ऑर्गनायझेशन अशी एक संस्था होती. शिवसेना सोडून दिलीप हाटे बाहेर पडले होते. त्यांनी ही विद्यार्थी संघटना काढली. काही मत्र्यांच्या ओळखीनं मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यावेळी काँग्रेसची एनएसयू, शिवसेनेची बीवीएस आणि दिलीप हाटे यांची आयसो अशा संस्था होता. त्यावेळई आयसोनं विजय मिळवला होता. त्यावेळपासून राजकरणाची आवड निर्माण झाली," असं आव्हाड म्हणाले. "यासाठी मी घरी बोलणीही ऐकायचो. माझ्या आईला ते कधीच आवडायचं नाही," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
UPSC ची संधी हुकली
"१९८४ मध्ये मी ग्रॅज्युएट झालो आणि त्याच वर्षी मी युपीएससी दिली. परंतु त्यावेळी मी ३ मार्क्सनं नापास झालो. त्यानंत लगेच पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली. त्यावेळी एका मार्कानं नापास झालो. आईची इच्छा मी चांगलं शिकून सरकारी नोकरी वगैरे करण्याची होती. त्यावेळी मरीन इंजिनिअरींगही करत होतो. माझ्या आयुष्यात ठरवून काहीच झालं नाही" असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
शरद पवारांबद्दलही सांगितला किस्सा
"सुरेश कलमाडी यांनी सर्वप्रथम मला शरद पवार यांच्याकडे नेलं. त्यानंतर पद्मसिंह पाटील यांच्यासोबतही माझे चांगले संबंध होते. शरद पवार हे दिल्लीवरून विमानतळावर आले तरी मी त्या ठिकाणी उभा असायचो आणि ते जात असले तरी मी विमानतळावर उभा असायचो. कोणत्याही ठिकाणी गेले तरी मी विमानतळावर जायचो. जवळजवळ १२ वर्ष मी हे केलं. आधी त्यांचं लक्ष नसायचं. पण जसं जसं त्यांना माझा चेहरा परिचयाचा वाटायला लागला तेव्हा त्यांनी ओळखही देण्यास सुरूवात केली," असं आव्हाड म्हणाले.
"एकदा त्यांनी मला घरी जाण्यासाठी गाडी आहे का असंही विचारलं. त्यानंतर तो किस्सा मी घरी आईला जाऊन सांगितला. तो एक वेगळा काळ आणि माझं पॅशन होतं. एकदा त्यांना मी पुण्याला भेटलो. ते विमानानं मुंबईला येऊन रात्री इस्रायलला जाणार होते. नशीबानं दुसऱ्या विमानातून सुरेश कलमाडी आले. त्यांच्या पीएनं मला विमानानं मुंबईला जा असं म्हटलं. त्यानंतर घरी आलो लगेच तयार होऊन पुन्हा शरद पवारांना सोडायला विमानतळावर गेलो. त्यावेळी त्यांनीही मला विचारलं एवढ्यात कसा आलास अशी विचारणा केली," असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.